आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाग रचना:जिल्हा परिषद, पं. स. मतदारसंघाच्या सुनावणीला 12 जणांची अनुपस्थिती

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषद, पंचायत समिती मतदारसंघांबद्दलच्या हरकती व सूचनांची सुनावणी पूर्ण झाली असून त्या सुनावणीला ७८ पैकी १२ जणांनी अनुपस्थिती दर्शवली. दरम्यान, सुनावणीअंती निश्चित करण्यात आलेली अंतिम प्रभागरचना आगामी सोमवार, २७ जून रोजी जाहीर केली जाणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांची प्रारूप यादी गेल्या दोन जून रोजी घोषित करण्यात आली. त्यानंतर ती नागरिकांच्या अवलोकनार्थ जिल्हाभर प्रकाशित करण्यात करुन त्यावर ८ जूनपर्यंत सूचना व हरकती मागवण्यात आल्या होत्या. या दरम्यान ७८ नागरिकांनी सूचना व हरकती दाखल केल्या होत्या. त्यापैकी ६६ जण सुनावणीला उपस्थित झाले तर इतर १२ जणांची अनुपस्थित म्हणून नोंद करण्यात आली. जि.प.च्या ६६ आणि पं.स.या १३२ मतदारसंघांच्या रचनेबाबत जिल्हाभरातून ७८ नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

या सर्व तक्रारींची सुनावणी गेल्या १७ जून रोजी विभागीय अपर आयुक्त विलेश सागर यांच्या दालनात घेण्यात आली. या सुनावणीनंतर मतदारसंघांच्या सीमांमध्ये योग्य ते बदल करणे सुरु असून, सोमवार, २७ जून रोजी अंतिम प्रभागरचना घोषित केली जाणार आहे. राज्य निवडणूक आयोगातर्फे जारी केलेल्या वेळापत्रकानुसार २ ते ८ जून या काळात नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या होत्या. उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयातील नोंदीनुसार दर्यापूर तालुक्यातील प्रभाग रचनेवर (मतदारसंघांचे सीमांकन) सर्वात जास्त २७ सूचना व हरकती प्राप्त झाल्या होत्या. त्याखालोखाल वरुड तालुक्यातून १६, चांदूर बाजार तालुक्यातून १२, अमरावती तालुक्यातून ८, धारणीतून ७, तिवसा, भातकुली, अचलपूर व अंजनगाव सुर्जी तालुक्यातून प्रत्येकी २ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या सर्व तक्रारींची सुनावणी १७ जून रोजी घेण्यात आली.