आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्हा परिषदेच्या शाळा नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू व्हाव्यात. इतर शाळांच्या तुलनेत त्यांची प्रतिष्ठा वाढावी आणि अधिकाधिक नागरिकांनी आपल्या पाल्यांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखल करावे, यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विशेष प्रयत्न सुरु आहेत. या प्रयत्नांचाच एक भाग म्हणून प्रत्येक तालुक्यात किमान एक शाळा मॉडेल (अत्याधुनिक) केली जाणार आहे. या प्रकल्पाला जिल्हा परिषदेने ‘इंद्रधनुष्य’ असे नाव दिले आहे. दरम्यान या सर्व मॉडेल शाळा आगामी सत्रापासून अस्तित्वात येतील, असा विश्वास सीईओ अविश्यांत पंडा यांनी व्यक्त केला आहे.
खासगी शाळांच्या तुलनेत उच्चशिक्षित व चांगली पात्रता बाळगणारे शिक्षक कार्यरत असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या खासगी शाळांच्या बरोबरीने चालत नाहीत. त्या काहीशा मागे पडताहेत, असे सध्याचे चित्र आहे.
हे चित्र बदलण्यासाठीच हा प्रयत्न केला जात असून त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तीन-तीन शाळांची निवड करण्यात आली आहे. यातील एक शाळा इंद्रधनुष्य प्रकल्पासाठी तर उर्वरित दोन शाळा ह्या आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत. दरम्यान इंद्रधनुष्यसाठी निवडण्यात आलेल्या शाळांची प्राथमिक पाहणी झाली असून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (डायट) शिक्षकांकरवी या शाळांसाठीची ‘ब्ल्यू प्रिंट’ही तयार करण्यात आल्याचे पंडा यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
अमरावती तालुक्यातील माहुली जहागीर, अचलपुर तालुक्यातील पथ्रोट (कन्या), अंजनगाव सुर्जी तालुक्यातील तुरखेड, भातकुली तालुक्यातील कामनापुर, चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी, चांदूर बाजार तालुक्यातील घाटलाडकी (उर्दू), चिखलदरा तालुक्यातील बोराळा, दर्यापुर तालुक्यातील शिंगणापुर, धामणगाव रेल्वे तालुक्यातील हिंगणगाव, धारणी तालुक्यातील खाऱ्या टेंभरुन, मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई (मुले), नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मांजरी म्हसला, तिवसा तालुक्यातील गुरुदेवनगर आणि वरुड तालुक्यातील घोराळ येथील शाळा इंद्रधनुष्य प्रकल्पाच्या यादीत समाविष्ट आहेत. येत्या मार्चअखेर या शाळांमध्ये जुजबी सोई उपलब्ध करुन दिल्या जाणार असून आगामी शैक्षणिक सत्रादरम्यान या शाळा सुरु करण्याची जिल्हा परिषद प्रशासनाची योजना आहे.
हे आहेत ‘मॉडेल’ शाळेसाठीचे निकष
शाळा म्हटली की केवळ चांगली इमारत नव्हे. बोलक्या भिंती, प्रयोगशाळा, ग्रंथालय-वाचनालय, क्रीडांगण, पिण्याच्या पाण्याची सोय, चांगले शिक्षक, विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेली गणवेश, पुस्तके आदींची उपलब्धता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे परिसराची स्वच्छता अशी व्यवस्था असणे आवश्यक आहे. इंद्रधनुष्य प्रकल्पांतर्गतच्या मॉडेल शाळेसाठी हे सर्व निकष ठरविण्यात आले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.