आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील उदखेड येथे जिल्हा परिषद शाळेची भिंत कोसळून त्यालगत असलेल्या घरातील एकाच कुटुंबामधील ९ जण दबल्याने जखमी झाले. ही घटना रविवारी १३ जूनला सकाळी सहाच्या सुमारास घडली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेवून दबलेल्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मंगेश लक्ष्मणराव कुरवाडे (३१), गजानन लक्ष्मणराव कुरवाडे (३४), आर्यन मंगेश कुरवाडे (६), सुर्यकांता मंगेश कुरवाडे (२६), नर्मदा लक्ष्मणराव कुरवाडे (६५), अंबिका गजानन कुरवाडे (३०), साक्षी गजानन कुरवाडे (१४), श्रेया गजानन कुरवाडे (१२) व सोनाली गजानन कुरवाडे (९) अशी भिंतीखाली दबून जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या संदर्भात देण्यात आलेल्या माहितीनुसार ऊदखेड येथील जिल्हा परिषद शाळेच्या बाजूला मागील अनेक वर्षांपासून कुरवाडे कुटुंबीय वास्तव्यास आहे. दरम्यान रविवारी १३ जूनला सकाळी कुरवाडे कुटुंबीय साखरझोपेत असतानाच ही घटना घडली. दरम्यान परिसरात मागील दोन दिवसांपासून जाेरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे शाळेची शिकस्त असलेली भिंत कुरवाडे कुटुंबीयांच्या घरावर पडली. त्यामध्ये पहाटेच्या वेळी साखरझोपेत असलेल्या कुरवाडे यांच्या कुटुंबातील नऊ सदस्य दबले गेले. त्यापैकी मंगेश कुरवाडे व आर्यन कुरवाडे हे टिनाखाली दबले गेले होते, परंतु दैव बलवत्तर म्हणून त्यांच्या जीवाला काेणताही धोका झाला नाही. या घटनेची माहिती मिळताच गावातील मोहन अढाऊ, किशोर पाटील, मनोहर कुरवाडे यांनी दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी मोर्शी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले. या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून औषधोपचार केला. वेळीच मदत मिळाल्यामुळे सुदैवाने किरकोळ मारावार ही घटना निभावली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. दरम्यान मागील काही दिवसांपासून तालुक्यात पावसाचे आगमन झाले.
दरम्यान जिल्हा परिषद शाळेची शिकस्त झालेली भिंत कोणत्याही क्षणी पडू शकते, अशी तक्रार कुरवाडे कुटुंबियांनी ग्रामपंचायतीकडे वारंवार केली होती. त्या अनुषंगाने १५ मार्च रोजी ग्रामपंचायतीच्या सभागृहात झालेल्या सभेत सरपंच कमलेश राठोड यांच्या नेतृत्वात जि. प. शाळेची भिंत डिसमेंटल झाल्याचा ठराव घेवून तो पंचायत समितीकडे पाठवण्यात आला होता. भिंतीचे बांधकाम करण्याविषयीची कारवाई सुरू असताना अचानक भिंत कोसळून ही दुर्घटना घडली.
शाळेच्या इमारतीविषयी पाठवला वरिष्ठांना अहवाल
या शाळेचे बांधकाम ८० वर्षे जूने असून, यापूर्वीच्या ग्रामपंचायत समितीने त्याकडे दुर्लक्ष केले. सध्याच्या ग्रामपंचायतीद्वारे मंडळ अधिकारी यांना शाळेच्या इमारती विषयी सर्व माहिती व लेखी अहवाल दिलेले आहे. त्यावर काम सुद्धा सुरू आहे. कमलेश राठोड, सरपंच
वेळ आली, पण काळ आला नव्हता
दोन दिवसांपासून परिसरात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे शिकस्त झालेली शाळेची भिंत कोसळली. सुदैवाने थोडक्यात बचावलो. वेळ आला होता, पण काळ आला नव्हता याची प्रचिती याची देही याची डोळा घेतली असल्याच्या प्रतिक्रिया कुरवाडे कुटुंबियांनी घटनेच्या अनुषंगाने व्यक्त केली.
तहसीलदारांनी केली परिवाराची विचारपूस
या घटनेची माहिती मोहन अढाऊ यांनी दूरध्वनीवरून आमदार देवेंद्र भुयार यांना दिली. दुसरीकडे मोर्शीचे प्रभारी तहसीलदार विठ्ठल वंजारी यांनी उपजिल्हा रुग्णालय येथे जावून जखमींची विचारपूस केली. त्यांच्या कुटुंबियांचे विचारपूस केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.