आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:308 मतदान केंद्रांवर 1 लाख 2 हजार मतदार बजावणार हक्क

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ९३ ग्रामपंचायतीमधील ९३ सरपंच पदासह तब्बल ६४९ सदस्य पदांसाठी रविवार दि. १८ रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या आखाड्यात आपले नशीब आजमावण्यासाठी १७०२ इच्छुक उतरले आहेत. या निवडणुकीसाठी जिल्ह्यात तयार करण्यात आलेल्या ३०८ मतदान केंद्रावर १ लाख २ हजार ४९९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १०० ग्रामपंचायतीच्या सरपंचांसह सदस्य पदा करीता निवडणुक जाहीर करण्यात आली होती. त्यात अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेकांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे निवडणुक होत असलेल्या १०० सरपंचांपैकी ७ सरपंच आणि ३०८ प्रभागातील ७७६ सदस्यांपैकी तब्बल १२७ सदस्य बिनविरोध विजयी झाले. त्यानंतरही उर्वरीत ९३ सरपंच पदासाठी २९१ आणि सदस्यांच्या ६४९ पदांसाठी १४१० असे एकुण १७०१ इच्छुक उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात कायम आहेत.

मतदान प्रक्रियेसाठी ३०८ पोलिंग बुथ असणार आहे. प्रत्येक बूथवर प्रत्येकी एक मतदान केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, प्रत्येकी एक पोलिस कर्मचारी, 40 झोनल अधिकारी हजर राहणार आहे. त्यासोबतच तहसीलचे दीडशेहून अधिक कर्मचारी कर्तव्य बजावणार आहे. शनिवार दि. १७ डिसेंबर रोजी अभियांत्रिकी महाविद्यालय येथून सर्व पोलींग पार्ट्या आपापल्या केंद्रावर रवाना झाल्या आहे. निवडणुकीसाठी बाराशेवर कर्मचार्‍यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलींग पार्ट्यांना ३५० कंट्रोल युनिट, ६०० बॅलेट युनिट आदींचे वितरण करण्यात आले आहे.

प्रचारासाठी केवळ १० दिवसांचा वेळ राज्याच्या राजकारणात सुरू असलेल्या घडामोडीमुळे सर्वच निवडणुका रखडुन पडल्या असतानाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यात नामांकन दाखल करण्याची प्रक्रीया पार पडल्यानंतर छाननी आणि अर्ज मागे घेण्यात आले. त्यानंतर प्रत्यक्ष प्रचारासाठी उमेदवारांना केवळ १० दिवसांचा अवधी मिळाला होता. त्यामुळे सर्वच उमेदवारांची तारांबळ उडाली होती.

सरपंचाच्या थेट निवडीने रंगत यंदा पार पडत असलेल्या ग्रामपंचायत निवडीमध्ये गावचे कारभारी असलेल्या सरपंचाची निवड थेट मतदानातून होणार आहे. त्यामुळे यंदाची निवडणुक खास ठरली आहे. त्यातही १०० ग्रामपंचातींपैकी ७ ग्रामपंचायतींचे कारभारी अविरोध निवडुन आले आहेत. त्यामुळे आता उर्वरीत ९३ ग्रामपंचायतींच्या सरपंचांची निवड करण्यासाठी मतदान पार पडत आहे. या निकालाकडे लक्ष राहणार आहे.

शिंदोला ग्रामस्थांचा निवडणुकीवर बहिष्कार वणी तालुक्यातील शिंदोला गावातील ग्रामस्थ शेतजमिनी अनेक पिढ्यांपासून वाहत आहेत. मात्र, त्या नावांवर केल्या नाहीत, याबाबत प्रशासनाला वेळोवेळी विनंती करून दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे १८ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात आला आहे. स्थानिक ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसह आगामी सर्वच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याच्या असा एकमुखी निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घेतला आहे. वणीचे उपविभागीय महसूल अधिकारी डॉ. शरद जावळेकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पुजलवार, शिरपूरचे ठाणेदार गजानन करेवाड यांनी ग्रामस्थांच्या मागण्या समजून घेऊन बहिष्कार मागे घेण्याचे आवाहन केले. याबाबत न्यायालयात खटला दाखल असल्याने शासन निर्णय घेऊ शकत नाही, असे एसडीओ जावळेकर यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही ग्रामस्थ त्यांच्या निर्णयावर ठाम आहे.

बातम्या आणखी आहेत...