आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीकविम्याचा हप्ता जमा:पीकविम्याचे 130 कोटी रुपये प्राप्त

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पीकविम्याचा हप्ता जमा करूनही भरपाई मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून दुरावत चालले आहेत. असे असले तरी यंदा जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकर्‍यांनी पिक विमा योजनेसाठी नोंदणी केलेली आहे. मात्र, त्यापैकी केवळ एक लाख ७५ हजार शेतकर्‍यांनाच पीक विम्याची रक्कम मंजुर झाली आहे. या मदतीसाठी १३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. प्रत्यक्षात अद्याप मदतीची ही रक्कम शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलेली नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

गेल्या काही वर्षात पीक विमा हप्ता भरल्यानंतरही शेतकर्‍यांना भरपाई मिळत नसल्याचा अनुभव अनेक शेतकऱ्यांना येत आहे. त्यामुळेच पीक विमा योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांची संख्या सातत्याने कमी होत आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख १५ हजार शेतकर्‍यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला आहे. पीकविमा योजनेतील सहभागी शेतकर्‍यांची संख्या कमी असतानाच जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी भरपाई मिळावी, याकरिता पूर्वसूचना देणार्‍या शेतकर्‍यांची संख्या त्यापेक्षाही कमी आहे.

कृषी विभागाने ४ लाख शेतकर्‍यांपैकी केवळ २ लाख शेतकर्‍यांचे पंचनामे पूर्ण केलेले आहेत. त्यातील १ लाख ७५ हजार शेतकर्‍यांना पीक विमा मंजूर केला आहे. पीकविमा कंपनीने १३० कोटी रुपये जिल्ह्यासाठी मंजूर केलेले आहेत. असे असताना दिवाळी संपूनही शेतकर्‍यांपर्यंत ती मदत पोहोचलेली नाही. त्यामुळे आधीच अडचणीत असलेले शेतकरी पिक विम्याच्या मदतीपासून वंचित होते. दरम्यान कृषी विभागाने संबंधित कंपनीला कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर पीक विमा कंपनीकडून निधी जमा करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे.

दरम्यान काही ठिकाणी एकापेक्षा जास्त वेळा आपत्ती आल्याने शेतकर्‍यांचे पुन्हा-पुन्हा नुकसान झालेले आहे, असे असल्यास प्रत्येक वेळेच्या आपत्तीसाठी नुकसान भरपाईचे अर्ज देता येणार आहेत. ज्या पंचनाम्यात जास्त नुकसानीची नोंद आहे. त्या प्रमाणात जास्त भरपाई मिळण्यासाठी अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे.

मदत न मिळाल्याने शेतकरी अडचणीत
पिकविमा काढल्यानंतरही झालेल्या नुकसानी संदर्भात पुर्व सुचना देण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागतो. ही प्रक्रीया बरेच शेतकरी करीत नसल्याने पिक विमा उतविणाऱ्यांच्या तुलनेत त्याचा लाभ मिळणाऱ्यांची संख्या अत्यल्प असते. यंदाही ती परिस्थिती कायम दिसुन येत आहे. त्यामुळे पिक विम्याची मदत न मिळाल्याने अनेक शेतकरी मोठ्या अडचणीत येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...