आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन:एकाच दिवसात 1396 सार्वजनिक मंडळांच्या दुर्गा मूर्तींचे केले विसर्जन

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हाभरातील सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळांच्या वतीने विराजमान करण्यात आलेल्या दुर्गा मूर्तीचे विसर्जन करण्यास मंगळवार दि. ४ ऑक्टोबर रोजी सुरूवात झाली. त्यात विसर्जनाच्या तिसऱ्या दिवशी गुरूवार दि. ६ ऑक्टोबर रोजी शहरी भागातील ३४७ तर ग्रामीण भागातील १०४९ अशा तब्बल १३९६ सार्वजनीक दुर्गोत्सव मंडळांनी त्यांच्या दुर्गामुर्तींचे विसर्जन केले. दोन वर्षाच्या विश्रांतीनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात माँ जगदंबेच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले. त्यासाठी ढोल-ताशांच्या गजरात विविध पथकांच्या सादरीकरणासह भव्य मिरवणुका काढण्यात आल्या.

यवतमाळच्या दुर्गोत्सवाने संपूर्ण राज्यात वेगळीच ओळख निर्माण केली आहे. दरवर्षी जिल्हाभरात असलेल्या सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाकडून वेगवेगळे देखावे, जानजागृती कार्यक्रम, विविध प्रकारचे उपक्रम आदी घेण्यात येतात. त्यामुळे नवरात्री उत्सव नऊ दिवस अत्यंत हर्षोउल्हासात पार पाडण्यात येतो. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे सर्वत्र अगदी साध्या पद्धतीने दुर्गोत्सव साजरा करण्यात आला. त्यात मंडळांनी सामाजिक भान राखून गर्दी टाळण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले. मात्र दोन वर्षांच्या विश्रांतीनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात नवरात्री उत्सव साजरा झाला.

दोन वर्षाची भर काढत यंदाच्या नवरात्री उत्सवात भव्य-दिव्य देखाव्यांची मेजवानीच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध झाली होती. सर्व सार्वजनिक दुर्गोत्सव मंडळाने ९ दिवस उत्साहात विविध कार्यक्रमाचे आयोजन केले. हे देखावे पाहण्यासाठी शहरातील नागरिकांसोबत संपुर्ण जिल्ह्यातील नागरिकांनी गर्दी केली. नवरात्री उत्सवाची भव्यता पाहण्यासाठी शेजारी जिल्ह्यासह शेजारी राज्यातील नागरिकही यवतमाळ येथे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. दरदिवशी लाखो भाविक शहरातील रस्त्यावर दिसत होते.

चौकाचौकांमध्ये पोलिसांचा कडेकाेट बंदोबस्त
आनखी दोन दिवस दुर्गा मुर्ती विसर्जन प्रक्रीया चालणार आहे. यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे. त्यात शहरात चौका-चौकात पोलिस बंदोबस्त तैनात आहे. प्रत्येक दुर्गोत्सव मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत पोलिस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान सहभागी होवुन लक्ष ठेवुन आहेत. या बंदोबस्तावर सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक लक्ष ठेवुन आहे.

बातम्या आणखी आहेत...