आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरीब, सामान्य आर्थिक परिस्थिती असलेल्या रुग्णांचा खासगी रुग्णालयात उपचारांवर होणारा लाखो रुपयांचा खर्च आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जनआरोग्य योजनेमुळे वाचला आहे. मागील दोन वर्षांत जिल्ह्यातील २४ हजार ४९८ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत आजारातून मुक्ती मिळवत निरामय आयुष्याकडे पाऊल टाकले आहे.
वाढत्या महागाईच्या काळात आजारांवर होणारा खर्च हा सामान्य आर्थिक परिस्थिती असलेले मध्यमवर्गीय आणि गरिबांच्या आवाक्याबाहेरचा ठरतो आहे. खासगी रुग्णालयांमध्ये होणारा हजारो, लाखोंचा खर्च परवडत नसल्याने कुणावर उपचार थांबवण्याची वेळ येऊ नये यासाठी महाराष्ट्र शासनाने २०१३ मध्ये राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना सुरु केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलून ती म. ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना केली गेली. तर, २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आयुष्यमान भारत ही आरोग्य विषयक योजना केंद्र सरकारने सुरु केली होती.
२०२० मध्ये या दोन्ही योजनांचे एकत्रिकरण करण्यात आले आहे. म. ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजनेतून दीड लाख रुपयांपर्यंतच्या ९९६ प्रकारच्या आजारांवर मोफत उपचार केले जातात. जिल्ह्यात आयुष्यमान भारत योजनेत २ लाख ९३ हजार कुटुंबातील १४ लाख ८ हजार सदस्य उपचारांसाठी पात्र ठरले आहेत. जिल्ह्यात या योजनेत उपचार घेण्यासाठी २६ खासगी रुग्णालयांनी नोंद केली आहे. २०११ मधील सामाजिक, आर्थिक जनगणनेच्या आधारे या कुटुंबाची निवड केली आहे. त्यांना उपचारांसाठी आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड काढणे आवश्यक असते. जिल्ह्यात २०२० पासून आतापर्यंत २४ हजार ४९८ जणांनी लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली.
मदतीसाठी आरोग्य मित्र
सरकारी किंवा खासगी रुग्णालयात या योजनेतून उपचार घ्यायचे असल्यास प्रत्येक ठिकाणी दोन आरोग्य मित्रांची नेमणूक आरोग्य विभागाकडून करण्यात आली आहे. उपचाराबाबत, कागदपत्रांबाबत सर्व प्रकिया हे आरोग्यमित्र करण्यासाठी मदत करतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.