आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घातक:डेक्कनच्या स्पेन्ट वॉशमुळे 200 क्विंटल मासे मृत्यूमुखी; शेतकऱ्यांचे सात लाख रुपयांचे नुकसान

महागाव9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेक्कन डिस्टलरीमधुन बाहेर पडणाऱ्या स्पेन्ट वॉश उघड्यावर फेकल्याने जमिनीत झिरपून मत्स्य तलावातील २०० क्विंटल मासे मृत्यूमुखी पडल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान होवून संकट कोसळले आहे.

महागाव तालुक्यातील गुंज येथे असणाऱ्या डेक्कन डिस्टलरीमधील घातक स्पेन्ट वॉश उघड्यावर फेकल्या जात असल्याने नैसर्गिक पर्यावरणासह, मानवी व वन्यजिवांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. भविष्यात एखादा मोठा अनुचित प्रकार घडू शकतो, याबाबतचे भाकीत वर्तवून दैनिक दिव्य मराठीने वृत्त प्रकाशित केले होते. ते आज खरे ठरले. डेक्कन मधील घातक स्पेन्ट वॉश टँकरद्वारे कारखाना परिसर व तालुक्यातील शिरपूर परिसरातील शेत, कोरड्या विहिरी, खदानी, जंगल भागातील पाणवठे यामध्ये फेकण्यात आले. कालांतराने याचा पाझर होवुन शिरपूर येथील युवा शेतकरी गौरव राजीव पाटील आपल्या शेतात निर्मिती केलेल्या मत्स्य तलावातील २०० क्विंटल मासे मृत्युमुखी पडले आहेत.

पाटील हे मत्स्य व्यवसायातून दरवर्षी ६ ते ७ लाख रुपयांचे उत्पन्न घेत असतात. परंतू डेक्कन डिस्टिलरीजच्या मनमानी कारभाराचा फटका त्यांना बसुन तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याने अंदाजे ७ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. डिस्टलरी व्यवस्थापनाच्या भोंगळ कारभारामुळे पाटील यांना पुढील दोन वर्षे उत्पादन घेता येणार नसल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या युवा शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ येवुन ठेपली असुन त्यांनी तहसीलदार महागाव व जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे डेक्कन डिस्टलरी व्यवस्थापनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळवुन द्यावी अशीही मागणी केली आहे.

पाणी नमुना तपासणी अहवाल गुलदस्त्यातच?
डेक्कन मधील विषारी स्पेन्ट वॉश परिसरातील शेतात, पाणवठे, जंगलभागातील पाणवठे याठिकाणी टाकण्यात आल्याने विहिरी, नाले, हातपंप यांना पिवळे, लालसर पाणी येत असल्याने शेत पिके, मानवी व वन्य प्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे वृत्त प्रकाशित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, प्रभारी तहसीलदार विश्वंभर राणे यांनी शेतातील विहिरी, नाले व पाणवठ्यांची पाहणी करून पिवळे व लालसर पडलेल्या पाण्याचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत पाठवण्याचे आदेश दिले. परंतु पाणी नमुने प्रयोगशाळेमध्ये पाठवून जवळपास १ महिना होत आला तरीही अद्याप अहवाल आला नसल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

प्रशासनाची कारवाई करण्यास टाळाटाळ?
महागाव तालुक्यातील डेक्कन डिस्टलरी व्यवस्थापनाने मनमानी कारभाराचा कळस गाठला असुन जीवसृष्टीला धोकादायक असणारे विषारी स्पेन्ट वॉश उघड्यावर व जलसाठ्यांमध्ये टाकुन नागरिकांसह, वन्यप्राण्यांच्या जीवाशी खेळण्याचा गंभीर प्रकार मांडला असतानाही कारखाना मालकाकडून विकणाऱ्या बाजऱ्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ व जिल्हा प्रशासनाने कोणत्याही स्वरूपाची कारवाई केली नसल्याचा आरोप नागरिक करीत आहेत.

नुकसान भरपाई न मिळाल्यास आंदोलन करू
मत्स्य तलावाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कुटुंबाचा उदरनिर्वाह केल्या जात असुन डेक्कनच्या नियोजन शुन्य कारभारामुळे तलावातील मासे मृत्युमुखी पडल्याने आर्थिक नुकसान होवुन कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा ठाकला. जिल्हा प्रशासनाने संबंधित कारखाना मालकाकडून तत्काळ नुकसान भरपाई मिळवुन द्यावी, अन्यथा आमरण उपोषण आंदोलन करू.
गौरव पाटील, नुकसान ग्रस्त शेतकरी .

बातम्या आणखी आहेत...