आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसुतीसाठी जात असलेल्या एका गरोदर मातेचा खड्डेमय रस्त्यामुळे वेदना होवून पोटातील बाळासह मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना उमरखेड तालुक्यातील ढाणकी ते बिटरगाव मार्गावर रविवार, दि. १० एप्रिल रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास घडली. नताशा अविनाश ठोके वय ३० वर्ष रा. मन्याळी असे मृत गरोदर मातेचे नाव आहे. दोन वर्षात या मार्गावर तब्बल २० ते २५ अपघात झाले असून या अपघातात चौघांना आतापर्यंत आपला जीव गमवावा लागला आहे.काळजाला भिडणारी अत्यंत दुर्देवी अशी ही घटना असून या घटनेला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभाग व प्रशासनास जबाबदार असल्याची ओरड आता नागरिकांकडून करण्यात करण्यात येत आहे. यापूर्वी याच खड्डेमय रस्त्याने तीन ते चार जणांचे प्राण घेतले असून कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन व लोकप्रतिनिधींना अद्यापही जागी आलेली नाही. सोमवारी मध्यरात्री झालेल्या माय लेकाच्या दुर्दैवी मृत्यूचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक बांधकाम विभाग रस्ता दुरुस्त करणार? की आणखी अशा घटनांची पुनरावृत्तीची वाट पाहणार हा मोठा प्रश्न आहे.
उमरखेड तालुक्यातील मन्याळी येथील आपल्या माहेरी नताशा ठोके ही बाळंतपणासाठी आली होती. सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास नताशा हिच्या पोटात वेदना होत असल्याने कुटूंबीय तिला एका खासगी वाहनाने ढाणकी येथील रुग्णालयात घेऊन जात होते. ढाणकी ते बिटरगाव या संपुर्ण मार्गावर खड्डे पडून असल्याने त्या खड्डेमय रस्त्याने नताशा हिच्या पोटात वेदना वाढू लागल्या. चिंचोली फाट्याजवळ अचानक गाडीतच तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या. वेळेत ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात न पोहोचता आल्याने उपचाराअभावी नताशा हिचा पोटातील बाळासह दुर्दैवी मृत्यू झाला.
सरकार किती जणांचा जीव गेल्यावर जागी होणार : बंदी भागातील नागरिकांनी रस्त्यामुळे लोकसभा निवडणुकीत बहिष्कार टाकला होता. मी निवडून येताच हा प्रश्र्न अधिवेशनात उपस्थित केला होता. मुख्यमंत्र्यांनी ३ महिन्यात समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले होते,असे आ.नामदेव ससाणेंनी सांगितले.
बंदी भागात आरोग्य सेवा कमकुवत
बंदी भागामध्ये आरोग्य सेवा कमकुवत असल्याने त्यांना ढाणकी तसेच उमरखेड तालुक्याच्या ठिकाणी रात्री-अपरात्री धाव घ्यावी लागते. मात्र खराब रस्त्यामुळे आपला रुग्ण वेळेत रुग्णालयात पोहोचेल याची कुठल्याही प्रकारची शाश्वती नाही. त्यामुळे वेळेत उपचार मिळत नसल्याने अनेक रुग्णांनी तर याच रस्त्यावर आपले प्राण सोडले तर काही गरोदर मातांनी आपल्या बाळांना जन्म दिला.
काम तातडीने करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
दरम्यान मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत या घटनेसंदर्भात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतला. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांना सक्तीचे निर्देश दिले. त्यात ढाणकी ते बिटरगाव रस्त्याचे काम तातडीने पुर्ण करण्याबाबत आदेश देण्यात आले आहे.
वारंवार आंदोलने, निवेदन तरीही दुर्लक्षच
आज भारत जागतिक महासत्तेकडे वाटचाल करत असताना अतिशय दुर्गम अशा बंदी भागात नागरिकांना आजही रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो ही फार मोठी शोकांतिका आहे. एकीकडे तर समृद्धी महामार्ग सारखे मोठे प्रकल्प शासन राबवत असताना ग्रामीण रस्त्याकडे का दुर्लक्ष होते, असा सवाल आता ग्रामीण जनता करू लागली आहे. वारंवार आंदोलने, निवेदने देऊनही या रस्त्याचे काम होत नसल्याने बंदी भागातील नागरिक त्रस्त झाले असून आणखी किती बळी गेल्यावर हा रस्ता होईल, हा प्रश्न या निमीत्ताने उपस्थित होत आहे.
नताशा ठोके या महिलेच्या मृत्यूमुळे मन्याळी गावावर शोककळा पसरली असून मन्याळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. खड्डेमय ढाणकी ते बिटरगाव रस्त्याची समस्या वारंवार वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आई सोबत बाळालाही प्राण गमवावा लागला, याला जबाबदार कोण, आता तरी दखल घेईल का, असे अनेक प्रश्न आता नागरिक विचारू लागलेत.
निधी मंजूर, आदेश मिळताच काम सुरू करणार
बिटरगावपासून ढाणकीकडे जाणाऱ्या चार किलोमीटर रस्त्यासाठी अडीच कोटी रुपये मंजूर झाले आहे. कार्यारंभ आदेश मिळताच नवीन रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, अशी प्रतिक्रिया सा. बांधकाम विभागाने शाखा अभियंता योगेश ढोले यांनी दिली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.