आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या:406 बीज परीक्षणात 4 निकृष्ट; बियाण्यांचे 337, तर खतांच्या 69 नमुन्यांची तपासणी

यवतमाळ10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेरणीपूर्व कापूस बियाण्यांचे ३३७, तर खतांचे ६९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. यात बियाण्यांचे चार नमुने निकृष्ट असल्याचा अहवाल नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेने दिला आहे. तर ढाणकी येथील एका कृषी केंद्रातून परवानगी नसलेले कीटकनाशक विक्री चालू होती. त्या कीटकनाशकाला विक्री बंदचे आदेश देण्यात आले आहे. या प्रकारामुळे बियाणे,कीटकनाशक खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत चांगलीच भर पडली आहे.

जिल्ह्यात नऊ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर खरीप हंगामाची लागवड होते. यात सर्वाधिक साडेचार लाख हेक्टरवर कापसाचा, तर दोन लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा होतो. त्याकरीता आवश्यक बि-बीयाण्यांसह खतांची नोंदणी करण्यात येते. तरीसुद्धा बोगस बियाणे लगतच्या राज्यातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात येतात.

विशेष म्हणजे बीटी कापूस बियाण्यांची विक्री सुद्धा होते. अशा परिस्थितीत पेरणी पूर्वीच बियाण्यांची काटेकोर तपासणी करावी, असे आदेश शासनाने दिले होते. त्याचप्रमाणे जूनपर्यंत कापूस बियाणे विक्री करण्यास पायबंद घातला होता. जून महिन्यापासून कापूस विक्रीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कृषी विभागाने कापूस, सोयाबीन बियाण्यांचे नमुने घेण्यात आले.

जिल्ह्यातून बियाण्यांचे ३३७, तर खतांचे ६९ नमुने घेतले होते. हे नमुने तपासणी करीता नागपूर येथील बीज परीक्षण प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. त्यामध्ये चार बियाणे उत्पादक कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने अपात्र ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्या चारही कंपन्यांना सध्या स्टॉप सेलचे आदेश देण्यात आले आहे.

यात प्रामुख्याने यशोदा, बूस्टर, महारुद्रा तसेच सीद्धा कंपन्यांच्या नमुन्याचा समावेश आहे. नमूने फेल आल्याने कृषी विभागाने संबंधित बियाण्यांची विक्री करू नये अशा सूचना दिल्या आहेत. यातील काही कंपन्यांचे कापूस व सोयाबीन दोन्ही उत्पादन असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे.

यासोबत उमरखेड तालुक्यातील ढाणकी येथील मे. गणपती ट्रेडर्सचा कीटकनाशकाचा परवाना ३० दिवसांकरता निलंबित करण्यात आला होता. आता बियाणे, किटकनाशक खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून, त्या शेतकऱ्यांसाठी पर्यायी व्यवस्था करून देणे गरजेचे आहे. यासाठी स्वत: कृषी विभागाला पावले उचलावे लागणार आहे.

शनिवारीही विजांचे तांडव : गेल्या आठ ते दहा दिवसांपासून विजांच्या कडकडाटात मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. अशात १८ जून रोजी सायंकाळच्या सुमारास यवतमाळ तालुक्यात विजांचा कडकडाट मोठ्या प्रमाणात चालू होता.

एक कीटकनाशक परवाना निलंबित
उमरखेड तालुक्यातील ढाणकी शहरांमध्ये अवैध कीटकनाशक विक्री चालू असल्याच्या माहितीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार तपासणी करण्यात आली होती. यावेळी विक्रीस मान्यता नसलेले कीटकनाशके दुकानात विक्री चालू असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे अवैध कीटकनाशक साठा, भावफलक लावलेले असून, त्यावर सर्व कीटकनाशकाचा समावेश केला नाही. मान्यता नसलेले कीटकनाशक विक्री केल्याचे आढळले. साठ व विक्री रजिस्टर अद्यावत भरले नव्हते. रजिस्टरमध्ये विक्रीला ठेवलेल्या सर्व कीटकनाशकाचा साठा पुस्तकात नोंद घेतल्याचे आढळून आले नाही. त्यावरून कीटकनाशक कायदा १९६८ च्या नियमानुसार कीटकनाशके परवाना ३० दिवसासाठी निलंबित केला आहे.

विक्री बंदचे आदेश
जिल्ह्यातील बियाण्यांचे ३३७, तर खतांचे ६९ नमुने पेरणी पूर्वी तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. यात चार नमुने नापास झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. संबंधितांना विक्री बंदीचे आदेश दिले असून, त्यांच्यावर बियाणे कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
राजेंद्र माळोदे, कृषी विकास अधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...