आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निधी मंजूर:उमरखेड, महागावमधील 155 पाणंद रस्त्यांसाठी 41 कोटींचा निधी मंजूर

महागाव4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मातोश्री ग्राम समृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमरखेड आणि महागाव तालुक्यातील १५५ गावातील १७४ किमी लांबीच्या पाणंद रस्त्यासाठी ४१ कोटी ७६ लाखांचा निधी खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने मंजूर करण्यात आला आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना आता बारमाही रस्त्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.

देशातील शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचा उपयोग वाढल्यामुळे यंत्र सामग्री शेतापर्यंत नेण्यासाठी आणि शेतमाल बाजारात पोहोचवण्यासाठी बारमाही शेतरस्त्याची आवश्यकता असते. असे रस्ते तयार करून शेतकऱ्यांना सुविधा देण्यासाठी राज्य शासनाने महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून मातोश्री ग्राम समृद्धी शेत, पाणंद रस्ते योजना राबवण्याचा निर्णय घेतला आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करून राज्यभरातून यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले होते. याच अनुषंगाने हेमंत पाटील यांनी मतदार संघातील शेतकऱ्यांना पाणंद रस्त्याचा लाभ व्हावा, या उद्देशाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री संदीपान भुमरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमरखेड, महागाव तालुक्यामध्ये पाणंद रस्त्यांना मंजुरी मिळवून आणली आहे. तालुक्यातील एकूण १५५ गावांमध्ये १७४ किलोमीटरचे रस्ते होणार असून याकरता ४१ कोटी ७६ लाख रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. रोजगार हमीच्या माध्यमातून ही कामे केली जाणार असल्यामुळे गावातील मजुरांना यामुळे हक्काचा रोजगार मिळणार आहे. पाणंद रस्त्यांच्या अभावामुळे शेतमालाच्या वाहतुकीला मर्यादा येतात. त्यामुळे शेतकरी फायद्याचे पीक घेत नाहीत. प्रमाणित दर्जाचे पाणंद रस्ते तयार करण्याकरता मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजना राबवण्यास मान्यता देण्यात आली आहे.

रस्ते हे विकासाच्या वाटा असतात ग्रामीण भागात शेतरस्त्याची भूमिका गावाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी महत्वाची आहे. अश्या रस्त्यामुळे शेती विकासालाही चालना मिळू शकेल, असेही पाटील म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...