आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार:24 तासांत 45 मृत्यू; एकाच दिवसात 1,323 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंतचे रेकॉर्डब्रेक करणारे आकडे

यवतमाळ11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 13 महिन्यांतील सर्वात मोठी संख्या ,नातेवाइकांच्या आक्रोशाचे चित्र मन हेलावून टाकणारे

जिल्ह्यात नव्याने आढळुन येणारे कोरोना रुग्ण आणि दरदिवशी होणारे मृत्युच्या संख्येने आता कळस गाठला आहे. एका दिवसात झालेले मृत्यू आणि पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांचे गेल्या १३ महिन्यांत आतापर्यंतचे सर्वात मोठे आकडे सोमवारी २६ एप्रिल रोजी समोर आले. या एकाच दिवशी अवघ्या २४ तासात तब्बल ४५ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यु झाला तर याच कालावधीत जिल्ह्यात तब्बल १३२३ नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. हे आतापर्यंतचे जिल्ह्यातील रेकॉर्डब्रेक आकडे आहेत हे विशेष. जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यु होण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. दरदिवशी मोठ्या संख्येने होत असलेले हे मृत्यू प्रशासनासाठी आव्हान देणारे ठरत आहे. एकाच दिवशी इतके मृत्यू होत असल्याने शवागारात मृतदेहांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत. इतकेच नव्हे तर या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या यंत्रणेवरही आता प्रचंड ताण वाढला आहे. दरदिवशी होणाऱ्या मृत्यूमुळे रुग्णालय परिसरात नातेवाइकांचा आक्रोश वाढला आहे. नातेवाइकांच्या आक्रोशाचे चित्र मन हेलावून टाकणारे आहे. मृत्युनंतर एकदा चेहरा पाहता यावा यासाठी मृतांच्या नातेवाइकांची गर्दी होत आहे. रुग्णांचे प्राण वाचावे यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी अहोरात्र झटत आहेत. मात्र जिल्हा रुग्णालय आणि सर्वच कोविड रुग्णालये यावर रुग्णांचा भार वाढला आहे. मोजक्याच मनुष्य बळाच्या भरवशावर ही यंत्रणा सुरू असल्याने आता आरोग्य यंत्रणाही थिटी पडायला लागली आहे.

जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे मृत्यु होण्याचे एकप्रकारे सत्रच सुरू झाले असुन, दरदिवशी त्यात वाढ होताना दिसत आहे. त्यातच गेल्या २४ तासांत जिल्ह्यात एकूण ४५ मृत्यू झाले. यातील ३३ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात, ४ मृत्यू डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये तर ८ मृत्यू खासगी रुग्णालयात झाले. सोमवारी झालेल्या एकूण ४५मृत्यूपैकी ३ मृत्यू जिल्ह्याबाहेरील आहे. त्यात आदिलाबाद, नवी मुंबई, नागपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. याच २४ तासांत जिल्ह्यात १३२३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून, ८०३ जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सोमवारी पॉझिटिव्ह आलेल्या १३२३ जणांमध्ये ७४४ पुरुष आणि ५७९ महिला आहेत. या दिवसभरात कोरोना तपासणीचे एकूण ६१५४ जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी १३२३ जण नव्याने पॉझिटिव्ह आले तर ४८३१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.सद्यस्थितीत जिल्ह्यात ६७०३ रुग्ण ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती २७३१ तर गृह विलगीकरणात ३९७२ रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९१३२ झाली आहे. जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या ४१२७२ आहे. आतापर्यंत एकूण ११५७ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर १२.५० असून मृत्युदर २.३५ आहे.

४ लाख नागरिकांची तपासणी
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात दरदिवशी मोठ्या संख्येत कोरोना तपासणी करण्यात येत आहे. इतकेच नव्हे तर आता २४ तासांत तपासणी अहवाल देण्यात येत आहे. आतापर्यंत ३९३०८० नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. यापैकी ३८८२०८ नमुन्यांचे अहवाल प्राप्त तर ४८७२ अप्राप्त आहेत. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत ३३९०७६ नागरिकांचे नमुने निगेटिव्ह आले आहे.

रुग्ण उपचारासाठी करताहेत उशीर,लक्षणे आढळताच उपचार सुरू करावा
जिल्हा रुग्णालयातील संपुर्ण यंत्रणा दिवसरात्र कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी झटत आहे. रुग्णांचा वाचविण्यासाठी डॉक्टरांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे अनेक अत्यवस्थ रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या रुग्ण खुप मोठ्या संख्येने वाढले आहेत. त्यातही रुग्णालयात उपचारासाठी येणारे बरेच रुग्ण फारच अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात येत आहेत. अशा रुग्णांना वाचविण्यासाठी डॉक्टरांना प्रयत्न करण्याचीही संधी बऱ्याचदा मिळत नाही. नागरिकांनी लक्षणे आढळताच उपचार सुरू करावा. डॉ. मिलिंद कांबळे, वै.अधिष्ठाता.

अत्यवस्थ रुग्णांसाठीच नाहीत बेड,प्रतीक्षा कायम
जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांपैकी जवळपास सर्वच रुग्णालयात बेडसाठी रुग्णांचे वेटिंग सुरू आहे. त्यात काही खासगी रुग्णालये आणि डेडिकेटेड कोविड रुग्णालयात ऑक्सिजन बेड आणि कोविड केअर सेंटरमध्ये साधे बेड शिल्लक आहेत. मात्र अत्यवस्थ रुग्णांसाठी आवश्यक असलेले आयसीयू बेड शासकीय किंवा खासगी अशा कुठल्याही रुग्णालयात शिल्लक असलेले दिसत नाही.जादा बेडचे नियोजन सुरु केले आहे.

अंत्यसंस्कारासाठी वाढल्या अडचणी
दरदिवशी मोठ्या संख्येने कोरोना रुग्णांचा मृत्यु होत आहे. या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याचा डोलारा पालिकेचे अधिकारी, कर्मचारी शहरातील नागरिकांच्या मदतीच्या भरवशावर करीत आहेत. मात्र आता मृत्युची संख्या वाढत चालल्याने त्यांना मिळत असलेली मदतही अपुरी पडायला लागली आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने येणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात अडचणी वाढु लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...