आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपाय योजना:जिल्हाभरात सात महिन्यांत आढळले ४५ डेंग्यूग्रस्त रुग्ण

यवतमाळ16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पावसाळ्यात साथीच्या आजाराच्या रुग्ण संख्येत वाढ होते. असे असताना यंदा डेंग्यू सदृष्य आजाराच्या रुग्ण संख्येवर बऱ्यापैकी नियंत्रण मिळाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्याभरात ४५ डेंग्यूग्रस्त आढळून आले. येत्या दोन महिन्यात रुग्ण संख्येत वाढ होण्याची शक्यता पाहून प्रशासनाने उपाय योजना करण्यास सुरूवात केली आहे.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने सर्वत्र थैमान घातले आहे. असे असताना साथरोगाच्या रूग्णांची संख्या समोर आली नाही, परंतू डेंग्यूग्रस्त रूग्णांचा आकडा गतवर्षी वाढलेला होता. गतवर्षी जवळपास चारशे रूग्ण आढळून आले होते. यंदा मात्र, डेंग्यूच्या आजारावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने जिल्हा हिवताप विभागाने सुरूवातीलाच उपाय योजना केल्या. परिस्थिती नियंत्रणात राहावी, ह्याकरीता प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात पथक कार्यान्वित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात ४ असे मिळून जिल्ह्याभरात ६४ पथक गठीत करण्यात आली आहेत. या पथकाच्या माध्यमातून अतिसंवेदनशील भागाचे आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत नियमित सर्वेक्षण, योग्य तो ओषधोपचार व रक्तनमुने तपासणीसाठी व्यवस्था करणे, मजूर वर्गाचे त्यांच्या आगमनाच्या वेळी सर्वेक्षण, योग्य औषधोपचार व त्यांच्या वस्त्यांवर नियमित सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळाल्याचे दिसून येते. गतवर्षी जानेवारी ते जुलै महिन्यापर्यंत ६३ रुग्ण आढळून आले होते. यंदा ४५ रुग्ण आतापर्यंत आढळून आले आहे. यात म्हसोला, गोधणी, गौळ, महागाव, काळी दौ., वरध, भांबोरा, रूंझा, झरीजामणी, लोहणबेळ, बोरगाव, पोहंडूळ आदी ठिकाणी डेंग्यूग्रस्त रूग्ण आढळून आले होते. सर्वांत महत्वाचे म्हणजे जुलै महिन्यात सरासरी पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे. त्यामुळे साथरोगाच्या आजारात वाढ होण्याची शक्यता होती. मात्र, नियंत्रण मिळ‌वता आले नाही.

डासांची उत्पत्ती टाळण्यासाठी ८६६ ठिकाणी सोडले गप्पी मासे
डासांची उत्पत्तीची ठिकाणे नष्ट करणे गरजेचे आहे. बऱ्याचवेळा शहरी आणि ग्रामीण भागात डासांच्या उत्पत्तीला चालणा देण्यात येते. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी गप्पी मासे सोडणे गरजेचे आहे, परंतू हिवताप विभागाने जानेवारी ते जुलै ह्या सात महिन्याच्या कालावधीत ८६६ ठिकाणी हिवताप विभागाच्या वतीने गप्पी मासे सोडण्यात आले.

यंदा पावसाळ्यापूर्वीच नियोजन केले, आवश्यक उपाययोजना करणे सुरू
दरवर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारात वाढ होते. यंदा पावसाळ्यापूर्वीच नियोजन करण्यात आले आहे. आवश्कतेनुसार पथके गठीत करण्यात आली असून, मुबलक प्रमाणात टॅमिफॉस्ट, औषधी, बीटीआय पावडर उपलब्ध आहे. आता ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात काळजी घेणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने उपाय योजना करणे सुरू आहे.
डॉ. विजय आकोलकर, हिवताप अधिकारी, यवतमाळ.

या बाबींकडे लक्ष देणे गरजेचे
डासांच्या उत्पत्तीचे ठिकाणे नष्ट करणे, शौचालायाच्या व्हेंट पाईपर जाळ्या लावणे, साचलेल्या पाण्यात गप्पी मासे सोडणे, सांडपाणी वाहते करणे, जूने टायर, प्लॅस्टिक आदीमध्ये पाणी साचू न देणे, वस्तीत घाण साठू न देणे, कचऱ्याची विल्हेवाट लावून स्वच्छता ठेवणे, आठवड्यातून एक दिवस सर्व पाण्याचे भांडे स्वच्छ धुवून किमान दोन तास उन्हात पुर्णपणे वाळवून कोरडा दिवस पाळणे आदी उपाययोजना कराव्या, असे आवाहन हिवताप विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...