आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कासवगती:चौकशी झालेल्या ग्रामपंचायत अपहार प्रकरणातील 5 कोटींची वसुली रखडली

यवतमाळ24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामपंचायत स्तरावर पार पडणाऱ्या विविध कामांमध्ये गैरप्रकार करुन पैशांची अफरातफर करण्यात आल्याची तब्बल १७२८ प्रकरणे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाली आहेत. यापैकी १३६२ प्रकरणांची चौकशी पुर्ण करण्यात आली असुन त्यात ६.३२ कोटींचा अपहार झाल्याचे सिद्ध झाले आहे. असे असताना या रकमेपैकी केवळ १ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात आली असुन अद्याप ५.३० कोटी रकमेची वसुली रखडुन पडली आहे. मात्र या वसुलीकडे जिल्हा परिषदेच्या वतीने गांभीर्याने लक्ष देण्यात येत नसल्याचे दिसते.

शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या अनेक योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आलेली आहे. त्यासाठी बराच निधी थेट ग्रामपंचायतींच्या खात्यात पाठविण्यात येतो. काही योजना पंचायत समिती स्तरावरुन राबवण्यात येतात मात्र त्याची देयके ग्रामपंचायतीमार्फत अदा करण्यात येतात. याच बाबीचा फायदा घेत ग्रामपंचायतीमध्ये विविध कामांमध्ये अपहार होण्याच्या घटना वाढत आहेत.

या घटनांसंदर्भात करण्यात आलेल्या तक्रारीवरून प्रथम पंचायत समिती स्तरावर आणि नंतर जिल्हा परिषद स्तरावर या अपहार प्रकरणांची चौकशी करण्यात येते. त्यानंतर दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करुन त्यांच्याकडून अपहार करण्यात आलेल्या रकमेची वसुली त्यांच्याकडून करण्यात येते. जिल्ह्यात असलेल्या १२६० ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या तब्बल १७२८ प्रकरणांमध्ये चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या १७२८ प्रकरणांमध्ये एकुण ४० कोटी ८० लाख रुपयांचा अपहार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. इतकेच नव्हे तर त्यामध्ये ७८० व्यक्तींवर दोषाचा ठपका ठेवण्यात आला होता.

दरम्यान १३५२ प्रकरणांमध्ये चौकशी पुर्ण करण्यात आली आहे. यामध्ये २० कोटी रुपयांच्या अपहाराचा संशय होता. मात्र समायोजित रक्कम १४ कोटी ३७ लक्ष असुन त्यामध्ये ६ कोटी ३२ लक्ष रुपयांचा अपहार झाल्याचे सिद्ध झाल्याने त्या रकमेच्या वसुलीचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यापैकी आतापर्यंत १ कोटी १९ लक्ष रुपयांची वसुली झाली असुन ५ कोटी ३० लक्ष रुपयांची वसुली अद्याप रखडलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने अपहार प्रकरणातील या रकमेच्या वसुलीकडे गांभीर्याने लक्ष देवुन ही वसुली पुर्ण करण्याची गरज आहे.

३६६ प्रकरणांची चौकशी थंडबस्त्यात
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहार प्रकरणांपैकी तब्बल ३६६ प्रकरणांमध्ये अद्याप चौकशी पुर्ण झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणांमध्ये गुंतुन असलेल्या २० कोटी रुपयांच्या संशयित रकमेबद्दल ही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे ही चौकशी देखील पुर्ण करुन प्रकरणे निकाली काढणे आवश्यक झाले आहे.

सर्वाधिक अपहार बाभुळगाव तालुक्यात
आतापर्यंत जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या अपहार प्रकरणांची आकडेवारी पाहता सर्वाधिक अपहार प्रकरणे ही बाभुळगाव तालुक्यातील असुन त्याची आकडेवारी २३१ इतकी आहे. याचवेळी सर्वात कमी म्हणजे केवळ २० अपहाराच्या तक्रारी असलेला तालुका हा दिग्रस असल्याचे दिसून येते.

दोषींपैकी ११८ व्यक्तींचा मृत्यू
ग्रामपंचायतींमध्ये अपहार झालेल्या प्रकरणांमध्ये आतापर्यंत तब्बल ७८० व्यक्तींवर दोष असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मात्र त्यापैकी ११८ जणांचा मृत्यु झाला असुन ३२५ जण आत्तापर्यंत सेवानिवृत्त ही झाले आहेत. यापैकी केवळ ६ व्यक्तींची प्रकरणे न्यायप्रविष्ट असुन उर्वरीत ३४४ जण कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...