आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनागोंदी:जिल्ह्यातील ६०० ई सेवा केंद्रांवर जादा दर आकारून केली जाते लूट; कागदपत्रे मिळवण्यासाठी ई सेवा केंद्रावर पालकांची धावपळ

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अकरावीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रमाणपत्राची मागणी महाविद्यालयांकडून होत आहे. त्यामुळे ई सेवा केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहे. जिल्ह्यातील ६०० ई सेवा केंद्रांनी शासनाने निर्धारित केलेल्या सेवाशुल्क व्यतिरिक्त कमीत कमी दीडशे रुपयांपासून अधिकाधिक हजारांच्या घरात सांगून लूट केली जात आहे. ई सेवा केंद्रांनी शासनाने निर्धारित केलेले सेवा शुल्क दर्शनी भागात लावून नागरिकांना सेवा पुरवण्याची गरज आहे.

जिल्ह्याचे ठिकाण, तालुका, बाजार भरणारी निम शहरे येथे पुर्वी सेतू केंद्र होते. त्या केंद्रातही भ्रष्टाचाराने शि‌रकाव केला. त्यामुळे त्याच शहरात ई- सेवा केंद्र चालवण्यास जिल्हा महसूल यंत्रणेने परवाना दिला. त्यानुसार तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयाशेजारी केंद्र सुरू झाली. शहरात विविध भागात केंद्रे उघडण्यात आली. जिल्ह्यात नोंदणीकृत ई सेवा केंद्राची संख्या ६०० इतकी आहे. केंद्राचा परवाना मिळताना सरकारने निश्चित केलेल्या दराची अट मान्य करायची, दाखलानिहाय दराचे फलकही बाहेर लावायचे. दोनशेवर ग्रामपंचायत स्तरावर ई सेवा केंद्र आहेत. तर चारशेच्या वर शहरी स्तरावर ई सेवा केंद्र आहेत. ई सेवा शुल्काचे फलक दर्शनी भागात लावणे आवश्यक आहे. परंतु बहुतांश केंद्रांचे फलक दिसत नाही. त्यामुळे जी सेवा ३३ किंवा ५३ रुपयांत मिळावयास पाहिजे. ती १००, १५० रुपयांत मिळते. त्यातही वेळेत दाखले मिळण्याची शक्यताही कमीच असते. आता महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. तर काही महाविद्यालये सुरू झाले आहे. त्यामुळे विविध दाखल्यांसाठी पालक ई सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. शेतकरीही काही दाखले घेण्यासाठी ई सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. अशावेळी त्यांची लूट करण्याचे काम ई सेवा केंद्र चालक करत आहे.

केंद्रांवर कारवाई करणार
जादा शुल्क आकारून लूट केल्याच्या तक्रारीवरून ई सेवा केंद्रावर कारवाई करण्यात आली आहे. केंद्र चालकाने जादा शुल्क घेतल्यास लोकांनी तक्रार दाखल करावी. तक्रारीवरून कारवाई करण्यात येणार आहे.
ललितकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी

ग्रामीण भागातील केंद्र बंद
नागरीकांच्या सुविधेसाठी शासनाने ई सेवा केंद्र ही विकासाभिमूख योजना अमलात आणली. परंतु मागील काही दिवसांपासून ग्रामीण भागातील ई सेवा केंद्र बंद पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.

बातम्या आणखी आहेत...