आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आनंदवन येथे शस्त्रक्रिया करण्यासाठी येत असल्याचे माहीत होताच त्यांना विनंती करून यवतमाळ जिल्ह्यातील रुग्णांची शस्त्रक्रिया करण्याची विनंती केली. समाजाच्या तळागाळातील अगदी गरीब व्यक्तीची त्यांनी अशा शिबिरांतून शस्त्रक्रिया केली आहे. आपल्या जिल्ह्यातील ५५१ लोकांच्या शस्त्रक्रिया त्यांनी पूर्ण केल्या. या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायम त्यांच्या ऋणात राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
स्व. वसंतराव नाईक वैद्यकिय महाविद्यालयात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या समारोपप्रसंगी झालेल्या रुग्णांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ रागिणी पारेख, जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, डॉ. सुरेंद्र भुयार व त्यांची चमू तसेच अधिष्ठाता मिलिंद फुल पाटील उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री राठोड म्हणाले, नेत्र शस्त्रक्रियेचा हा पहिला टप्पा आज संपन्न झाला आहे. जिल्ह्यातील एकूण ३००० रुग्णांच्या शस्त्रक्रिया करणार आहे. डॉक्टर लहाने यांना जसा जसा वेळ मिळेल तशा त्या शस्त्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. डोळे हा अतिशय नाजुक भाग आहे. त्यामुळे शस्त्रक्रिया केलेल्या सर्व रुग्णांनी डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे डोळ्यांची काळजी घ्यावी.
यावेळी बोलताना डॉ. लहाने यांनी या शिबिरात पूर्णपणे अंध झालेल्या ६२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली असल्याचे सांगितले. एका महिलेचे हिमोग्लोबिन पाच असूनही भुल न देता तिचे ऑपरेशन केले. मला कितीही दुखले तरी चालेल पण मला दृष्टी द्या असे जेव्हा ती मला म्हणाली, तेव्हा वाईट वाटले. त्यामुळे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. आज तिची दृष्टी परत मिळाल्याचा आनंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या शिबिरासाठी अथक कार्यरत असलेली वैद्यकीय महाविद्यालयाची चमू, डॉ. जळके यांनी १२५ च्या वर शस्त्रक्रिया केल्या आहेत, सिव्हिल सर्जन यांची पूर्ण टीम यांचे त्यांनी आभार मानले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.