आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिबंधात्मक उपाय:जिल्ह्यात 9 जनावरांना लंपी स्कीनची लागण ; बाजार बंदचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

यवतमाळ20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात झरी जामणी मधील मुकुट बन येथे ६, बेमाडदेवी येथे २ आणि बाभुळगाव येथे एक, अशा एकूण नऊ जनावरांना लंपी आजाराची लागण झाली आहे. त्यांच्यावर औषधोपचार चालू असून, या तीन गावांच्या पाच किलोमीटर परिघातील गावातील जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. लंपी स्कीन आजाराचा जिल्ह्यात प्रादुर्भाव लक्षात बघून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व बैल बाजार बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी दिले.

जिल्ह्यात सहा लाख ८४ हजार जनावरे असून, यामध्ये एक लाख म्हैस आणि उर्वरित गाय वर्गीय जनावरांचा समावेश आहे. अशात लंपी आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यात जनावरांच्या अंगावर १० ते २० मिमी व्यासाच्या गाठी, सुरूवातीस भरपूर ताप, डोळे, नाकातून चिकट स्राव, चारा पाणी खाणे कमी अथवा बंद, दुध उत्पादन कमी, काही जनावरांत पायावर सूज, लंगडणे, अशी रोगाची लक्षणे आहे. तर कॅप्रीपॉक्स विषाणूमुळे या रोगाचा संसर्ग होतो. जिल्ह्यात आतापर्यंत ९ जनावरांना लंपी आजाराची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. यात झरी जामणी मधील मुकुट बन येथे ६, बेमाडदेवी येथे २ आणि बाभुळगाव येथे एक, ह्या नऊ जनावरांचा समावेश आहे. आजाराला पायबंद घालता यावा म्हणून ग्रामस्तरीय समित्या ॲक्टिव्ह करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. गावात आणि गोठ्यात फवारणी करावी, तालुका पशुधन अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील गावात भेटी देऊन शेतकऱ्यांच्या जनावरांची तपासणी करावी तसेच आजारांसंबंधी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती द्यावी, अशाही सुचना दिल्या. जिल्ह्यात सध्या ५ हजार लसी उपलब्ध आहेत. मात्र लसीकरण वाढविण्यासाठी ७८ हजार लसींची मागणी करण्यात आल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले यांनी दिली. लंपी आजारामुळे अद्याप पर्यंत एकाही जनावरांचा मृत्यू झाला नसल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त मोहन गोहत्रे यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला उपाय योजनांचा आढावा
जिल्ह्यातील लंपी स्कीन आजाराची माहिती आणि प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा आढावा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सोमवार, दि. १२ सप्टेंबर रोजी घेतला. या प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी ललीतकुमार वऱ्हाडे, पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. मोहन गोहत्रे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. क्रांती कोटोले व पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. आजाराच्या प्रसारा संबंधी तांत्रिक अभ्यास करून जनावरांवर उपचार, औषधी, लसींची मागणी करण्याबाबत सूचना दिल्या. गोशाळेत आजाराची लागण होणार नाही, याची काळजी घेण्याबाबतही सुचविले आहे.

बातम्या आणखी आहेत...