आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शहरातील आर्णी मार्गाने घेतला मोकळा श्वास

यवतमाळ25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अतिक्रमणाने गिळंकृत केलेले शहरातील रस्ते आणि मुख्य रस्त्यांच्या बाजुचे फुटपाथ मोकळे करण्यासाठी पालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दि. ४ नोव्हेंबर रोजी बसस्थानक चौकातून पुढे जाणाऱ्या आर्णी मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढल्याने बऱ्याच दिवसानंतर आर्णी मार्गाने मोकळा श्वास घेतला.

शहरातील रस्त्यांवर वाढलेले अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण मोहिम सुरू करण्यात आली आहे. गुरूवार दि. ३ नोव्हेंबर रोजी सुरू झालेल्या या मोहिमेत तहसील चौकापासून नेताजी चौकापर्यंत अतिक्रमण काढण्यात आले. त्यानंतर आज शुक्रवारी नेताजी चौक ते बसस्थानक चौक आणि बसस्थानक चौकापासून आयुर्वेदिक महाविद्यालय चौकापर्यंतचे आर्णी मार्गावरील अतिक्रमण काढुन टाकण्यात आले आहे. या मोहिमेदरम्यान सुचना दिल्यानंतरही स्वत:हुन अतिक्रमण न काढणाऱ्या अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण जेसीबीने काढुन फेकण्यात आले.

नेताजी चौक ते बसस्थानक चौकापर्यंत बसस्थानकाच्या भींती शेजारी असलेल्या अतिक्रमण धारकांपैकी काहींसोबत पालिका कर्मचारी यांची शाब्दिक बाचाबाची झाली. मात्र त्यानंतरही अतिक्रमण काढण्याचे काम सुरू ठेवले.

दरम्यान आर्णी मार्गावरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू करण्यात आले. त्यात आयुर्वेद महाविद्यालया पर्यंतचे अतिक्रमण काढण्यात आले. अतिक्रमण काढण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. मात्र त्यानंतर अतिक्रमण काढण्याचे काम पुढे न झाल्याने ही मोहिम शनिवारी पुढे राबवण्यात येण्याची शक्यता आहे. वनवासी मारोती पर्यंत अतिक्रमणे या मोहिमेत काढण्यात येणार आहेत. या कारवाई दरम्यान पालिकेचे नगर अभियंता विनय देशमुख, उपअभियंता विलास वातीले, आरोग्य विभागाचे गजानन वातीले, राहुल पळसकर, अमोल पाटील, भुषण कोटंबे, साजीद, लता गोंधळे, अशोक मिसाळ यांच्यासह पालिकेचे इतर कर्मचारी आणि पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...