आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका छोट्याशा गावातील सतरा वर्षीय एका शाळकरी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी वडकी पोलिसांनी दोन नराधमांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणातील तिन महिला आरोपींचा शोध वडकी पोलिस घेत आहेत. पवन पुरुषोत्तम गेडाम (२२) रा. बोरी गोटमार ता. मारेगाव आणि किशोर दिलीप मन्ने (२५) रा. रोहिणी ता. राळेगाव अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहे.
या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, राळेगाव तालुक्यातील वडकी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील अल्पवयीन मुलगी १४ सप्टेंबरला सकाळी १० वाजता कॉलेजला जाण्यासाठी घरून निघाली. मात्र ती परत आली नसल्याने नातेवाइकांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला. परंतु मुलगी कुठेही मिळून आली नसल्याने शेवटी चार दिवसांनी म्हणजे दि. १८ रोजी दुपारी २ वाजता मुलीच्या नातेवाइकांनी वडकी पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. या तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दरम्यान, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता वडकी येथील ऑटोपाईंट परिसरातून त्या मुलीने अनोळखीच्या फोनवरून घरी फोन लावला. त्यानंतर नातेवाइकांनी तीला घरी आणले. दुसऱ्या दिवशी १९ सप्टेंबरला सायंकाळी ५ वाजता नातेवाईक त्या मुलीला घेऊन वडकी ठाण्यात आले. महिला अमालदारांनी तिची विचारपूस केली, मात्र घाबरली असल्यामुळे तीने काहीच सांगितले नाही. अखेर पोलिसांनी रात्री तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले व २० सप्टेंबरला सकाळी मुलगी व तिचे नातेवाईक आपल्या गावी गेले.
त्यानंतर दि. २१ सप्टेंबरला मुलीच्या आईने तिला विश्वासात घेऊन विचारणा केली असता, तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब उघड झाली. लगेच दि. २२ सप्टेंबरला नातेवाइकांनी मुलीसह पुन्हा वडकी पोलिस ठाणे गाठले व महिला पोलिस कर्मचारी व दक्षता समितीसमोर मुलीचे बयान घेण्यात आले. त्यात मुलीच्या ओळखीच्या महिलेने वाढोणा येथे तिला घरी बोलवले व घरीच डांबून ठेवले, घरी आणखी दोन महिलांना बोलावल्यानंतर एका वाहनात बसवून मारेगाव तालुक्यातील बोरी गोटमार येथे घेऊन गेले. वाहनात जात असता ती महिला फोनवर कोणाशीतरी ‘कुमारिका आहे, वीस हजार लागतील’, असे बोलत होती. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलीला बोरी गोटमार येथे नेऊन एका खोलीत ठेवले व त्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाल्याची बाब पीडित मुलीने पोलिस व दक्षता समितीसमोर सांगितली. या आधारे पोलिसांनी गुन्ह्यात वाढ करुन कलम ३६३ ३६६ अ ३७६ ३४ नुसार गुन्हे दाखल करून पवन गेडाम आणि किशोर मन्ने या दोघांना दि. २२ सप्टेंबरला मध्यरात्री अटक केली. या गुन्ह्यात सामील असलेल्या मुख्य तीन महिला आरोपींचा पोलिस शोध घेत असून, घटनेचा तपास वडकी ठाणेदार विनायक जाधव करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.