आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचनामे:महिना लोटला, तरीही ऑगस्टच्या नुकसानीचे पंचनामे रखडलेलेच

यवतमाळ3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑगस्ट महिन्यातील नुकसानीचे पंचनामे त्वरित करावे, असे आदेश कृषिमंत्र्यांनी दिले होते. आता दहा दिवसांचा कालावधी लोटला. तरीसुद्धा पंचनामे झालेच नसल्याची माहिती कृषी विभागाने दिली. यावरून कृषी विभागाचा कारभार स्पष्ट दिसत आहे. विशेष म्हणजे जून आणि जुलै महिन्यातील नुकसानीची दमडीही मिळालेली नाही. यंदा पावसाने जिल्ह्यात उशिराने एन्ट्री मारली. मात्र, विलंबाने कोसळलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला. जुलै महिन्यातील संततधार पावसामुळे साधारणत: शंभराहून अधिक हेक्टरवरील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. शेकडो हेक्टरवरील जमिनी खरडून गेल्या, तर अनेक गावे सुद्धा जलमय झाले होते.

अशा परिस्थितीत कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करावे, असे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विरोधी पक्षनेते अजीत पवार यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. त्यांनीसुद्धा नुकसानीचे सर्वेक्षण त्वरीत करावे, असे आदेशित केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महसुली मंडळाचे सर्वेक्षण केले असता, तीन लाख एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने अडीचशे कोटी रूपयांचा मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविला आहे. मात्र, अद्यापपर्यंत शासनाने दमडीही पाठवली नाही. असे असताना ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून संततधार पावसाने हजेरी लावली. सलग कोसळलेल्या पावसाने पुन्हा मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्राचे नुकसान झाले. साधारणत: एक लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज कृषी विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.

दरम्यान, कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांनी जिल्ह्याचा दोन दिवसीय दौरा केला. या दौऱ्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर त्वरीत पंचनामे करून शासन दरबारी अहवाल सादर करावे, असे आदेशित केले होते. आता कृषी मंत्र्यांच्या दौऱ्याला दहा दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीसुद्धा कृषी विभागाचे पंचनामे अद्यापही आटोपले नाही. यासंदर्भात कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात अहवाल सादर केल्या जाईल, अशी माहिती दिली.

ई-केवायसीसाठी उरले केवळ तीन दिवस
पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्या अनुषंगाने ई-केवायसी करणे गरजेचे आहे. मात्र, बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलीच नाही. अशा शेतकऱ्यांनी बुधवार, दि. ३१ ऑगस्ट रोजी पर्यंत केवायसी करावी, असे आवाहन करण्यात आले होते. आता याकरता अवघ्या तीन दिवसांचा अवधी शिल्लक राहिला असून, उर्वरीत शेतकऱ्यांनी त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन केले.

महिन्याच्या अखेरपर्यंत अहवाल येतील
ऑगस्ट महिन्यात कोसळलेल्या पावसाने जवळपास एक लाख हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले असून, सध्या सर्वेक्षण चालु आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत संपूर्ण अहवाल येईल. त्यानंतर मदतीचा प्रस्ताव पाठवण्यात येईल. जून, जुलै महिन्याच्या नुकसानीचे कुठलेही पैसे प्राप्त झाले नाही.नवनाथ कोळपकर, जिल्हा कृषी अधिक्षक, यवतमाळ.

गतवर्षीच्या नुकसानीचा ३४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी पडून
जिल्ह्यात गतवर्षी मोठ्या प्रमाणात पावसासह गारपीट सुद्धा झाली होती. यात ऑक्टोबर महिन्यात २२ हजार ७८२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्या अनुषंगाने २२ कोटी ८० लाख, तर डिसेंबर मधील गारपिटीने ११ हजार १०० हेक्टरवरील क्षेत्र बाधित झाले होते. त्याचासुद्धा ११ कोटी ४३ लाख, असे मिळून ३४ कोटी २३ लाखांचा प्रस्ताव शासन दरबारी पडून आहे. या नुकसानीचेही अद्याप पर्यंत पैसे प्राप्त झाले नाही हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...