आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या काही महिन्यात शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत असल्याने शहरामध्ये सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचा आरोप यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीकडून करण्यात येत आहे. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी पालिका मुख्याधिकारी यांच्या दालनाला चपलांचा हार लावुन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. शुक्रवार दि. १६ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या आंदोलनाने पालिका कार्यालयात एकच खळबळ उडाली होती.
गेल्या तीन-चार महिन्यांपासून यवतमाळ शहरातील घनकचरा व्यवस्थापनाची घडी विस्कळीत झाली आहे. सर्वत्र घाण व कचरा पसरला आहे. घंटा गाड्या सुद्धा बंद पडलेल्या आहेत. सफाई कामगार नियमित कामावर येत नाहीत. बंद पडलेल्या घंटागाड्या कित्येक दिवस नादुरुस्त असतात. तसेच त्या दुरुस्त सुद्धा केल्या जात नाही. त्यामुळे घरातील कचरा संकलनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. नाल्या तुडुंब भरल्या आहेत. सर्वच वार्डांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचलेला आहे. त्यामुळे दुर्गंधी सुटून नागरिकांच्या आरोग्याची समस्या निर्माण होत आहे.
या सर्व समस्या संदर्भात निवेदन मुख्याधिकारी यांना देण्यासाठी काँग्रेस पदाधिकारी आले होते. यावेळी मुख्याधिकारी हजर नसल्याने काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर चपलांचा हार टाकून निषेध नोंदविला.
यावेळी काँग्रेस शहर अध्यक्ष चंदू चौधरी, माजी नगरसेवक जावेद अंसारी, माजी नगरसेवक बबलू देशमुख, माजी नगरसेविका वैशाली सवाई, ॲड. घनश्याम अत्रे, दत्ता हाडके, उमेश इंगळे, अजय किन्हीकर, बबली भाई, अरुण ठाकूर, अनिल चवरे, अजय म्हैत्रेकर यांच्यासह मोठ्या प्रमाणात काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
अतिक्रमण मोहिमेत धनदांडग्यांची पाठराखण
शहरांमध्ये सध्या अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे. नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण काढण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. ज्या अतिक्रमण धारकांचा रहदारीला किंवा वाहन पार्किंगला अडथळा निर्माण होत आहे अशा व्यावसायिकांचे अतिक्रमण काढल्यास कुठली हरकत नाही. कारण या ठिकाणी रहदारीला अडथळा होणार नाही े. मात्र या कारवाईत पालिका मोठ्या धन दांडग्यांना पाठीशी घालत आहे व लहान व्यावसायिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसच्या वतीने करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.