आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील नवरगाव येथील दवाखाना बंद करुन स्कूटीने मारेगाव येथे स्वगृही परत जाताना चार अज्ञात चोरट्यांनी रिव्हॉल्व्हरच्या धाकावर एका खासगी डॉक्टरचे सिने स्टाईल अपहरण करून लुटल्याची खळबळजनक घटना मारेगाव नजीक नायरा पेट्रोल पंपाजवळ सोमवार, दि. १३ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. ऐन रहदारीच्या परिसरात ही मोठी घटना घडल्याने तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. पोभास रवींद्रनाथ हाजरा वय ४५ वर्ष, रा. मंगलम् पार्क, असे लुटण्यात आलेल्या खासगी डॉक्टरचे नाव आहे. डॉ. हाजरा यांचे तालुक्यातील नवरगाव येथे खासगी रुग्णालय आहे. ते नेहमी प्रमाणे रुग्णालय बंद करुन सोमवारी सायंकाळी ७ ते ८ वाजता दरम्यान मारेगावकडे अॅक्टिव्हा क्रमांक एमएच २९ बीबी-२८६७ ने परत येत होते.
अशात करंजी-वणी राज्य महामार्गावर मारेगाव नजीक नायरा पेट्रोल पंपजवळ डॉ. हाजरा यांचे दुचाकीला सिरीज क्रमांक नसलेल्या पांढऱ्या रंगाची कार क्रमांक एमएच ३१-६३०७ ने अचानक आडविले. त्यावेळी कार मधील २८ ते ३२ वयोगटातील चार अज्ञात इसमापैकी तिघे जण खाली उतरले. एकाने दुचाकी धरली, तर दुसऱ्याने रिव्हॉल्व्हर लावली आणि तिसऱ्याने जिवे मारण्याची धमकी देत बळजबरीने डॉ. हाजरा यांना कारमध्ये बसविले. यावेळी रिव्हॉल्व्हर धाक दाखवित त्यांच्याजवळील रोख २४ हजार, १५ हजार रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ३० हजार किंमतीचा १२ ग्रॅम वजनाचा सोन्याचा गोप हिसकावला. चोरटे इथेच न थांबता फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देत चक्क पुन्हा २५ लाखांची मागणी केली.
दरम्यान, फिर्यादीने वणी येथील एका मित्राला तीन लाख रुपये घेवून बोलवत एका ऑटोमोबाइल दुकानासमोर कारचा अर्धा काच खाली करुन तीन लाख रुपये घेतले. तद्नंतर डॉ. हाजरा यांना जीवे मारण्याच्या धमक्या देत कारच्या खाली उतरवून चोरट्यांनी पळ काढला. घटनेनंतर लगेच डॉ. हाजरा यांनी मारेगाव पोलिस ठाण्यात धाव घेत घडलेली आपबीती पोलिसांना सांगितली. मारेगाव पोलिसांनी त्या चार अज्ञात चोरट्या विरोधात कलम ३९२, ३६३, ३६४, (अ), भादंवी सहकलम ३/२५, ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी करीत आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून १४ मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांनी मारेगाव गाठले. प्रकरणाचा छडा लावण्याच्या दृष्टीने आवश्यक पावले उचलण्यासंदर्भात स्थानिक पोलिसांना निर्देश दिले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.