आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:शासनदरबारी पाठवला दीडशे लालपरीचा प्रस्ताव

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील नऊ आगाराचा कारभार खिळखिळ्या साडेचारशे एसटी बसेसवर आहे. तरी सुद्धा प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे विभागीय नियंत्रक कार्यालयाकडून दीडशे लालपरीचा प्रस्ताव शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळणार की नाही हे येणारी वेळच सांगेल.

एसटी महामंडळाला कोरोना काळात मागील दोन वर्षे अतिशय खडतर गेले आहेत. कोविड काळात एसटी महामंडळाच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. त्यानंतर अनेक महिने सुरू असलेला एसटीचा संप. याचा थेट परिणाम एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता.

या सर्व गदारोळात एसटी महामंडळाच्या सेवेवर परिणाम झाला होता. एकंदरीत सर्वच ठप्प झाले होते. त्यामुळे महामंडळात नवीन एसटी बस दाखल होत नव्हत्या. विभागातील नऊ आगारात असलेल्या ४५० पैकी ५० टक्के बसेसची स्थिती वाईट आहे. त्या कधी दम सोडतील याचा नेम नाही. सुरक्षित प्रवासाच्या नावावर एसटी महामंडळ भाडेवाढ करत असली तरी प्रवाशांच्या आरामाबाबत मात्र गंभीर नाही. जुन्या बसेसची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. जिल्ह्यात यवतमाळ, पुसद, वणी, नेर, राळेगाव, उमरखेड, दारव्हा, पांढरकवडा, दिग्रस या नऊ आगारात एकूण ४५० बसेस आहेत. परंतू यामधील ४० बसेस बंद पडलेल्या आहे.

यात काही बसेसचे इंजीन नादुरुस्त झाल्याने बंद असून काही बसेस अपघातग्रस्त आहेत. काही बसेस फारच जुन्या आहे. त्या कुठेही बंद पडतात. त्याची तात्पुरती दुरुस्ती करून काम भागवले जात आहे. त्यामुळे विभागात नवीन बस मिळाव्यात अशी मागणी आता प्रवाशांकडून केली होती. या सर्व बाबी लक्षात घेत परिवहन महामंडळाने विभागातून १५० नवीन बसेससाठी शासन दरबारी प्रस्ताव पाठवल्याची माहिती राज्य परिवहन विभागाने दिली.

१५० नवीन बसेसची मागणी
विभागातील नऊ आगारातील काही बसेस नादुरुस्त आहे. नवीन बसेससाठी शासन स्तरावर प्रक्रिया सुरू आहे. यवतमाळ विभागाकडून १५० बसेसचा प्रस्ताव पाठवला. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर रस्त्यांवरही महामंडळाच्या बस धावू शकतील.- अमोल गोंजारी, विभाग नियंत्रक

बातम्या आणखी आहेत...