आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोठया भावाच्या बायकोवर वाईट नजर ठेवून असलेल्या लहान भावाने वाद घालून सख्या मोठ्या भावाचा खून केल्याप्रकरणी आरोपी लहान भावास जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. ही घटना जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील आहे. हा निकाल २५ मे रोजी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए.एस.वैरागडे यांनी दिला. जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील मृत रमेश गणपत फुसे वय २६ याचे लग्न होऊन त्यास पत्नी अर्चना वय २२ व गायत्री नावाची एक मुलगी आहे. त्याचा लहान भाऊ नीलेश गणपत फुसे वय २२ याची त्याच्या वहिनीवर वाईट नजर होती. ही बाब लक्षात येताच रमेश फुसे हा पत्नी व मुलीला घेऊन गावातून शेतात राहायला गेला. दरम्यान, २८ एप्रिल २०१७ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास नीलेश फुसे हा शेतात गेला. त्यावेळी त्याचा मोठा भाऊ व इतर घरात झोपलेले होते. त्यावेळी नीलेशने त्याच्या मोठ्या भावाला दरवाजा उघडा मला तुझ्या बायकोशी संबंध ठेवायचा आहे. असे म्हणून आवाज दिला. मात्र रमेशने घरातून शिविगाळ केली. त्यावेळी नीलेश रात्री घरी परत गेला. सकाळी ११ ते १२ वाजताच्या सुमारास नीलेश पुन्हा शेतात गेला. त्यावेळी रमेश हा शेतातील काम करुन घरासमोर झोपला होता. तर पत्नी व मुलगी बाजूलाच बसली होती. तेव्हा नीलेशने रात्री तुझ्या बायकोशी संबंध का ठेऊ दिले नाही, असे म्हणून शिविगाळ करत वाद घातला. तसेच वखराची पास रमेशच्या डोक्यात मारली. यात तो गंभीर जखमी झाला. यावेळी त्याची पत्नी व मुलगी पळत आले असता नीलेश घटनास्थळावरून पसार झाला. गंभीर अवस्थेत रमेशला जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. या घटनेची तक्रार अर्चना रमेश फुसे यांनी जळगाव जामोद पोलिस स्टेशनला दिली. आरोपी नीलेश हा वाईट नजरेने पाहत होता व शरीर सुखाची मागणी करत होता. यातून घटना घडल्याचे तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी नीलेश फुसे यास अटक केली. जळगाव जामोद पोलिसांनी तपासाअंती न्यायालयात दोषारोप पत्र दखल केले. २५ मे रोजी न्यायालयात या प्रकरणी सुनावणी करण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने १३ साक्षीदार तपासण्यात आले. मृताची सहा वर्षाची मुलगी गायत्री हिची साक्ष महत्त्वाची ठरली. साक्षीदारांची साक्ष व अतिरिक्त शासकीय अभियोक्ता उदय आपटे यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपी नीलेश गणपत फुसे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच १० हजार रुपये दंडही देण्यात आला. दंडातील ५ हजार रुपये रक्कम फिर्यादीस देण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहेत. असेही न्यायालयाने निकालात नमूद केले. कोर्ट पैरवी म्हणून एएसआय काशरनाथ तायडे यांचे सहकार्य मिळाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.