आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआज देश तेरापंथी जैन समाजाचे आचार्य महाश्रमण यांचा षष्ठ्यब्दीपूर्ती (६० वा जन्मदिवस) सोहळा साजरा करत आहे. तेरापंथी तीन प्रमुख मुनीजनांशी माझा घनिष्ठ संबंध राहिला आहे. आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ आणि वर्तमान तेरापंथ प्रमुख आचार्य महाश्रमण यांनी गत जवळपास शंभर वर्षांत भारतातच नाही तर अनेक देशांत जैन-जीवनमूल्ये इतक्या सहजभावनेने प्रसारित केली की, त्यांचा स्वीकार करण्यात कोणत्याही धर्माला वा संप्रदायाला काही किंतु-परंतु वाटला नाही. आचार्य महाश्रमण यांनी ५२ हजार किलोमीटर पदयात्रा केली. पायी चालत ते भूतान आणि नेपाळलाही गेले. यादरम्यान नेपाळमध्ये महाप्रलयंकारी भूकंप झाला. मात्र आचार्यजींनी आपली यात्रा थांबवली नाही.
कोणतीही सुरक्षा मागितली नाही. आपल्या या प्रवासात त्यांनी कोणत्याही बिगर जैनधर्मीयांस धर्मबदलासाठी प्रोत्साहित केले नाही. जैन होण्याचा अर्थ आहे-जितेंद्रिय बनणे. म्हणजे काम, क्रोध, मद, लोभ आणि मोहावर विजय मिळवणे. या विजयांचा दुसऱ्यांना उपदेश करणे तर अतिशय सोपे आहे, मात्र आपल्या जीवनात त्यांचा अंगीकार करणे अतिशय कठीण काम. या तिन्ही संतांच्या प्रवचनांमधून त्यांच्या विलक्षण बुद्धिमत्तेसह प्रचंड उदारपणाही सतत प्रकट होत असतो. त्यांच्या प्रवचनांत मला कधीच संकुचितपणा, धार्मिकता, जातीबद्दल भेदभाव वा राजकारण दिसले नाही. याच कारणामुळे त्यांची प्रवचने तुम्ही हिंदू, मुस्लिम, शीख, ख्रिश्चन आणि ज्यूंच्या उपस्थितीतही ऐकू, पाहू शकता. ही उदारवृत्ती इतकी लोकप्रिय झाली की त्यामुळे दिगंबर आणि श्वेतांबरच नव्हे, तर सर्व जैन-संप्रदाय आजकाल कोणत्या ना कोणत्या रूपात एकत्र काम करताना दिसतात. भगवद्गीता आणि धम्मपद यावर आचार्य महाश्रमण प्रवचन करतात तेव्हा हिंदू आणि बौद्धधर्मीयही चकीत होतात.
जैन धर्म अतिशय विलक्षण आहे. ही तर्कसंगत व्यवहारप्रणाली आहे. जैन धर्म सृष्टीचे निमित्त कारण मानत नाही. तो सृष्टीकर्त्या ईश्वराचे अस्तित्व स्वीकार करत नाही, मात्र आत्मा, पुनर्जन्म आणि कर्मफळ यांना मानतो. पुनर्जन्म होतो की नाही हा माझ्यासाठी संशोधनाचा विषय आहे. मात्र चेतना वा आत्मा आणि कर्मफळ तर तर्क आणि विज्ञानाच्या कसोटीवर शंभर टक्के खरे उतरतात. त्यांना शुद्ध आणि पवित्र ठेवण्याचा संदेश जैन धर्म देतो. त्यामुळे मी मानतो की, जैन धर्म केवळ विश्वासाचाच नव्हे, तर व्यवहारचाही धर्म आहे. तुम्ही परमात्म्यावर विश्वास ठेवा वा नका ठेवू, मात्र तुमचा स्वत:वर विश्वास असणे अतिशय गरजेचे. नैतिक होणे हेच जैन होणे होय. हाच संदेश आचार्य तुलसी, आचार्य महाप्रज्ञ आणि आचार्य महाश्रमण देतात. सन १७६० मध्ये म्हणजेच २६२ वर्षांपूर्वी तेरापंथ संप्रदायाची स्थापना भिक्षू स्वामींनी केली. या संप्रदायाच्या मुनींनी लाखो-कोट्यवधी लोकांना मांसभक्षण आणि मद्यपानापासून मुक्ती मिळवून दिली. शाकाहाराचा अंगीकार आणि मद्य निषेधाचा प्रचार बिगर जैन लोकांमध्ये होण्याची गरज आहे.
आचार्य तुलसी यांनी १९४९ मध्ये अणुव्रत आंदोलन सुरू केले होते. ते विश्वव्यापी बनवण्यासाठी महाप्रज्ञजी आणि महाश्रमणजी यांनी भरपूर प्रयत्न केले. अणुव्रतांची कल्पना महावीर स्वामी यांच्या पाच व्रतांमधून निर्माण झाली आहे. ते आहेत - अहिंसा, सत्य, अस्तेय (चोरी न करणे), ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह. या पाच व्रतांना आपल्या दर्शन ग्रंथांत ‘यम’ म्हटले आहे. याच व्रतांच्या आधारावर सरळ आणि सूक्ष्म ११ नियम तुलसीजींनी बनवले होते. या नियमांमध्ये धार्मिक, सहिष्णुता, निरस्त्रीकरण, व्यवसायात प्राथमिकता, ब्रह्मचर्य, व्यसनमुक्त सदाचारी जीवन, अहिंसा, पर्यावरण सुरक्षा आदींचे पालन करण्याची प्रतिज्ञा केली जाते.
जैनमुनींचे त्यागमय जीवन अतुलनीय आहे. भारतातील कोट्यवधी लोक मग ते कोणत्याही धर्माचे असोत त्यांनी अणुव्रत घेतल्यास भारताला विश्वगुरू बनण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. अणुव्रत आंदोलनाचे कर्णधार आचार्य महाश्रमण यांना षष्ठ्यब्दीपूर्तीनिमित्त शुभेच्छा. त्यांनी शतायुषी व्हावे आणि अशीच मानवतेची सेवा करावी हीच सदिच्छा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.