आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी इम्पॅक्ट:बोगस डॉक्टरांवर कारवाईचा बडगा

महागावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाव तालुक्यात ग्रामीण भागात आपली दुकानदारी थाटून रुग्णांच्या जिवाशी बोगस डॉक्टरांचा सुरू असलेला खेळ थांबविण्यात यावा, यासाठी दै. दिव्य मराठीने वृत्त मालिका लावताच अखेर आरोग्य विभागाला जाग येवुन त्यांनी बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.महागाव शहरासह ग्रामीण भागात कोणताही वैद्यकीय परवाना नसतांना दवाखाना थाटून मुळव्याध, भगंदर, गुप्तरोग यांसह विविध दुर्धर आजारांवर उपचार करण्याच्या नावाखाली शासनाने बंदी घातलेली गोळ्या औषधे बेसुमार देवुन रुग्णांच्या जिवाशी खेळण्याचा खेळ बोगस डॉक्टरांनी सुरू केला आहे. त्यामुळे याकडे लक्ष घालुन आरोग्य विभागाने कारवाई करावी याबाबत दै. दिव्य मराठीने वृत्त मालिका लावुन आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणा उघड केला होता.

अखेर तालुका आरोग्य विभागाला जाग येवुन त्यांनी या बोगस डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याचे काम हाती घेतले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र आडे यांनी पथकासह तालुक्यातील काळी (दौ) येथे सुरू असलेल्या बोगस बंगाली डॉक्टर समर बिश्वास यांच्या रुग्णालयावर धाड टाकली. यावेळी त्यांच्याकडेच असलेले वैद्यकीय साहित्य जप्त करून या बोगस डॉक्टरविरोधात पुसद ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार भादंवि १८६०, कलम ४२०, महाराष्ट्र वैद्यक व्यवसाय अधिनियम २००० कलम ३३ (१), ३३ (२) नुसार गुन्हे दाखल केले आहे.

यावेळी कारवाई करतांना आरोग्य विभागाच्या पथकामध्ये डॉ.नरेंद्र आडे यांच्यासह आरोग्य सहाय्यक नरेंद्र जाधव, आरोग्य सेवक महेंद्र कांबळे, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पंकज आडे, आशा सेविका शेख रेहान, काळी (दौ) ग्रा.प.कर्मचारी सुदेश नरवाडे, अ.मझार अ.मजिर यांच्यासह सरपंच निशा संतोष राठोड, माजी पं. स.सदस्य सुनील टेमकर, संतोष राठोड,गोपाल राठोड उपस्थित होते.

कारवाईच्या भीतीने अनेक बोगस डॉक्टर भूमिगत
बोगस बंगाली डॉक्टरवर झालेल्या कारवाईने तालुक्यातील बोगस डॉक्टरांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईच्या भीतीने अनेक बोगस डॉक्टर भूमिगत झाले असल्याची माहिती असुन या डॉक्टरांच्या मुसक्या आवळण्याचे तगडे आव्हान तालुका आरोग्य विभाग समोर उभे ठाकले आहे.

सर्वच बोगस डॉक्टरांवर कारवाई करा
आरोग्य विभागाने सद्या एकाच डॉक्टरांवर कारवाई केली.सर्वच बोगस डॉक्टरांवर कारवाई केल्या जावी, हा आमचा मुद्दा आहे. त्यामुळे या डॉक्टरांवर कारवाई न झाल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करण्याच्या मुद्द्यावर ठाम आहोत.-सुनील चव्हाण, मनसे तालुकाध्यक्ष महागाव.

बातम्या आणखी आहेत...