आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचे नुकसान झाल्याची तक्रार आल्यास प्रथम त्या तक्रारीची योग्य चौकशी करावी, ही तक्रार जिल्हास्तरीय समितीच्या समोर ठेवुन त्या समितीच्या अहवालानंतरच संबंधीत डॉक्टरवर कारवाई करावी असे न्यायालयाचे निर्देश आहे. मात्र प्रत्यक्षात या आदेशाला बगल देण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस यंत्रणा आणि प्रशासन यांना अशा प्रकरणात योग्य चौकशी केल्यानंतरच कारवाई करा अशा सुचना देण्यात याव्या अशी मागणी यवतमाळ जिल्हा आयएमएच्या वतीने करण्यात आली आहे. त्यासंदर्भात मंगळवार दि. १२ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
राजस्थान येथे एका महिला डॉक्टरांवर करण्यात आलेल्या आरोपानंतर थेट गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यामुळे संबंधीत डॉक्टरने आत्महत्या केली. या प्रकरणाचे पडसाद संपुर्ण देशात उमटले आहे. त्याच अनुशंगाने यवतमाळ जिल्हा आयएमएच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. त्यात वैद्यकीय व्यवसाय अथवा रुग्णालयाकडून रुग्णावर उपचार करताना निष्काळजीपणा दाखवल्यामुळे किंवा योग्य उपचार न करणे, उपचार वेळेवर न करणे, अशा प्रकारच्या तक्रारी नातेवाईक लोकांकडून केल्या जातात. प्रसंगी डॉक्टरांवर व रुग्णालयावर हल्ला केला जातो.
रूग्णालयाच्या मालमत्तेचे नुकसान केले जाते. त्यामुळे डॉक्टरांचा नाहक मानसिक छळ होत असतो. अशा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार डॉक्टरांविरुद्ध अथवा रुग्णालयाने उपचारादरम्यान हलगर्जीपणा केला आहे किंवा कसे ही बाब प्रथम त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीकडून तपासून घेण्याबाबत व संबंधित डॉक्टर अथवा रुग्णालयाने वेळीच उपचार केले नाहीत अथवा उपचारादरम्यान काही चुका केल्याचे निष्पन्न झाल्यास तज्ञ समितीच्या निष्कर्षांनुसार पुढील कार्यवाही करणे अपेक्षीत असते. समितीचा अहवाल घेतल्याशिवाय उपचार करणारे डॉक्टर व रुग्णालये यांच्याविरुद्ध तक्रार नोंदवता येत नाही. तसेच या बाबीची पालन न केल्यास संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल अशी निरीक्षणे सर्वोच्च न्यायालयाने नोंदवली आहेत. शासन निर्णयान्वये जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तज्ञ समिती नियुक्त करण्यात आली आहे.
डॉक्टर किंवा रुग्णालय विरुद्ध तक्रार प्राप्त झाल्यावर प्रथमतः सदर तक्रारी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्यात यावे. तज्ञ समितीने दिलेल्या अहवालात निष्कर्ष आधारे पोलीस यंत्रणेने डॉक्टर रुग्णालय यांच्याविरुद्ध पुढील कारवाई करण्यात बाबत निर्णय घ्यावा. ही बाब सर्व प्रशासन व पोलीस यंत्रणा यांच्या निदर्शनास आणून द्यावी अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे.
निवेदन देतेवेळी आयएमएचे माजी राज्याध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड, राज्य समन्वयक डॉ. अशोक चौधरी, जिल्हाध्यक्ष डॉ. संजय रत्नपारखी, सचिव डॉ. शरद राखुंडे, आयएमए एमआयएस अध्यक्ष डॉ. प्रशांत कसारे आदी डॉक्टर उपस्थित होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.