आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धडक मोहीम:थर्टी फर्स्ट’ची मौजमजा करणाऱ्या 319 वाहनधारकांवर कारवाई

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नव्या वर्षांचे स्वागत मद्यपानाने करण्याच्या गेल्या काही वर्षांपासून रुजलेल्या परंपरेला यंदाचे वर्ष अपवाद कसे ठरणार? रात्रभर धांगडधिंगा करणारे, मद्यप्राशन करून धूम स्टाईल वाहने चालवणारे, क्षमतेपेक्षा अधिक जणांची वाहतूक करणारे दुचाकीस्वार पोलिसांच्या जाळ्यात सापडले. पोलिस यंत्रणेने ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री संपूर्ण जिल्ह्यात राबवलेल्या मोहिमेंतर्गत शेकडो वाहनांची तपासणी केली. यादरम्यान मद्यपान करून वाहन चालवणाऱ्यांसह इतर अशा ३१९ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत १ लाख ०९ हजार ६०० रुपये दंड आकारला.

गेल्या काही वर्षांपासून ‘थर्टी फर्स्ट’ला वेगळे स्वरुप प्राप्त झाले आहे. तळीरामांसाठी हा खास दिवस. मद्यपानाद्वारे नवीन वर्षांचे स्वागत होते असा त्यांचा समज. यामुळे या दिवशी मद्यपींकडून घातला जाणारा गोंधळ सर्वसामान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.

एसपींच्या ताफ्याचीही शहरात गस्त
शनिवार, ३१ डिसेंबरला रात्री जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, अपर पोलिस अधीक्षक पियूष जगताप यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी, कर्मचारी आणि स्थानिक पोलिस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा एकत्रीत ताफा शहरात फिरला होता. यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून संपूर्ण फिस्क पाईंटची तपासणी करण्यात आली. त्यामूळेच शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही, हे विशेष.

कारवाई आणि आकारलेला दंड
अवधुतवाडी : ८ जणांवर कारवाई १०००/- दंड
यवतमाळ शहर : ७ जणांवर कारवाई १७०० /- दंड
लोहारा : १३ जणांवर कारवाई ५४०० /- दंड
पांढरकवडा : ४४ जणांवर कारवाई १६,५०० /- दंड
वणी : ९२ जणांवर कारवाई ३०,१००/- दंड
पुसद शहर : ३९ जणांवर कारवाई १५,८००/- दंड
वसंतनगर : २० जणांवर कारवाई ७०००/- दंड
उमरखेड : ४५ जणांवर कारवाई १८,७००/- दंड
दारव्हा : १६ जणांवर कारवाई ५५००/- दंड
आर्णी : १३ जणांवर कारवाई २६००/- दंड
नेर : २२ जणांवर कारवाई ५३००/- दंड

धारदार चाकूसह युवकाला अटक
शहरातील इंदिरा नगरातील मोक्षधाम परिसरात धारदार चाकू घेवून फिरणाऱ्या एका युवकाला अवधुतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवार, दि. ३१ डिसेंबरला रात्री ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली. रोहित पुडके वय २१ वर्ष रा. अशोक नगर पाटीपूरा असे ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी अवधुतवाडी पोलिस ठाण्यात जमादार संजीव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे नोंद केले आहे.

बातम्या आणखी आहेत...