आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्घटना:नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने बकऱ्या चारणाऱ्या वृद्धाचा मृत्यू

महागाव6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने बकऱ्या चारणाऱ्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथे शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. रामजी राघोजी मेटकर (७२) रा. हिवरा संगम असे मृत वृद्धाचे नाव आहे.प्राप्त माहितीनुसार, महागाव तालुक्यातील हिवरा (संगम) येथील रामजी मेटकर गुरुवारी नेहमीप्रमाणे बकऱ्या चरण्यासाठी काऊरवाडी शिवारात गेले होते. दुपारी २ च्या सुमारास जोरदार पाऊस पडल्याने ते बकऱ्या घेवून घराकडे निघाले. रस्त्यातील नाला ओलांडत असतांना नाल्याला अचानक पूर आल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर ते वाहून गेले. बकऱ्या मात्र घराकडे आल्या.

वडील घरी न आल्याने त्यांच्या मुलांनी व नातेवाइकांनी सर्वत्र त्यांचा शोध घेतला. परंतु कुठेच पत्ता न लागल्याने शुक्रवारी सकाळी पुन्हा कुटुंबीयांसह नातेवाइकांनी पुसनदीचा काठ व नाल्यामध्ये शोध घेतला असता नदीला नाला मिळत असल्याच्या काही अंतरावर रामजी यांचा मृतदेह नदी पात्रात तरंगताना आढळून आला. या घटनेची माहिती पोलिस पाटील प्रवीण कदम व महसूल कर्मचारी जीवन जाधव यांनी प्रशासनाला कळवली. घटनेची माहिती मिळताच बिट जमादार संतोष जाधव यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी सवना ग्रामीण रुग्णालयात पाठवला. रामजी मेटकर यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.

बातम्या आणखी आहेत...