आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी द्या पाणी:रिकामे हांडे घेऊन संतप्त नुक्ती ग्रामस्थांची जिल्हा कचेरीवर धडक; जिल्हाधिकाऱ्यांसह सीईओंना मागण्यांचे निवेदन सादर

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घाटंजी तालुक्यातील नुक्ती येथील ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. भरीसभर ग्रामसेवक व्देषातून पिण्याच्या पाण्यापासून वंचित ठेवत आहे. या प्रकारामुळे संतप्त ग्रामस्थांनी बुधवार, दि. ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेत पाण्याचे रिकामे हंडे घेत धडक दिली. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

घाटंजी तालुक्यातील चोरांबा ग्रामपंचायतीत महेश मंचलवार ग्रामसेवक म्हणून कार्यरत आहे. यात नुक्ती गट ग्रामपंचायत असून, ह्या ठिकाणी स्वतंत्र पाणी पुरवठा योजना अस्तित्वात आहे. गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यापासून ग्रामसेवकाने वंचित ठेवले. यासंदर्भात वारंवार विचारणा केली, परंतू कुठलीही उपाय योजना केलीच नाही. दरम्यान, तहसीलदारांनासुद्धा निवेदन देण्यात आले होते. ग्रामसेवकासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केलेल्या दुर्लक्षीतपणामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या सुटलीच नाही. भर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पायपीट करून पाणी आणावे लागत आहे. अशात सोमवार, दि. २ मे रोजी ग्रामस्थांनी पंचायत समितीत धडक दिली. यावेळी गटविकास अधिकारी आणि ग्रामसेवकाने संगनमत करून ग्रामस्थांना अश्लील भाषेत शिविगाळ केली. त्याचप्रमाणे ग्रामस्थांवर शासकीय कामात अडथळा केल्या प्रकरणी गुन्हे दाखल केले आहे. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बुधवार, दि. ४ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासह जिल्हा परिषदेत पाण्याचे रिकामे हंडे घेऊन धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तद्नंतर हा मोर्चा जिल्हा परिषदेकडे वळवला होता.

शेवटी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना ग्रामस्थांनी निवेदन दिले. आणि त्वरीत पाणी पुरवठा पूर्वनियोजित करावा, हेतूपुरस्पर दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावे, अशी मागणी निवेदनातून केली. यावेळी काणुपातळा राठोड, अण्णा पाटील, रंजना रावळे, जयश्री खोब्रागडे, सुमन तेलंग, निर्मला गेडाम, रमा वानखडे, वेणू खोब्रागडे, विठाबाई गेडाम, नीलिमा थुल, बेबीबाई पाटील, शोभा नगराळे, शिल्पा सूर्यवंशी, वर्षा अंबुरे यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या.

बातम्या आणखी आहेत...