आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामातृभाषेतून कोणत्याही स्वरूपाचे ज्ञान सहज प्राप्त करता येऊ शकते. तसेच मातृभाषा उत्तम प्रकारे अवगत असेल तर इतर भाषा सुद्धा सहजपणे आत्मसात करता येईल, आपल्या मातृभाषेला समृद्ध करायचे असेल तर दैनंदिन व्यवहारात मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे ही प्रत्येक व्यक्तीची जबाबदारी आहे. असे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना केले. लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा तसेच काव्यवाचन स्पर्धा पार पडली.
१४ ते २८ जानेवारी हा कालावधी ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मराठी विभागातर्फे काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दुर्गेश कुंटे तर डॉ. कविता तातेड आणि प्रा. ज्ञानेश्वर गटकर परीक्षक म्हणून लाभलेले होते. याप्रसंगी मंचावर कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. जान्हवी कुंटे, मराठी विभाग प्रमुख डॉ. ममता दयणे, वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. योगिता बोरा उपस्थित होत्या.
विद्यार्थिनींच्या मराठी भाषाविषयक वाचन व लेखन कौशल्याचा विकास व्हावा, या उद्देशाने प्रस्तुत स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे, असे डॉ. ममता दयणे यांनी प्रास्ताविकात सांगितले. कनिष्ठ महाविद्यालयाच्या पर्यवेक्षिका प्रा. जान्हवी कुंटे यांनी मराठी भाषेची महती विशद करून विद्यार्थिनींना मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त शुभेच्छा दिल्या. काव्यवाचन स्पर्धेला परीक्षक म्हणून उपस्थित असलेल्या डॉ. कविता तातेड यांनी विद्यार्थिनींना काव्यवाचन स्पर्धेच्या संदर्भात मार्गदर्शन करताना''आधुनिक काळातील आईचे चित्रण विद्यार्थिनींनी आपल्या लेखणीतून शब्दबद्ध करावे'' असे विचार मांडले.
प्रा. ज्ञानेश्वर गटकर यांनी विद्यार्थिनींना काव्यवाचन करताना कवितेचा आशय, सादरीकरण,आणि वाचिक अभिनय या घटकांच्या संदर्भात मार्गदर्शन केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित ''आई या विषयावरील काव्यवाचन स्पर्धेत ४९ विद्यार्थिनींनी स्वरचित तसेच प्रतिभावंत कवींच्या कविता सादर केल्या. विद्यार्थिनींच्या श्रवण आणि लेखन कौशल्याला वाव मिळावा याकरिता शुद्धलेखन व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ७३ विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनोद चव्हाण तर आभार डॉ. सुचिता ढेरे यांनी केले. प्रा. कमलेश देशपांडे, प्रा.नारायण वाघमारे, प्रा. सतीश देशपांडे, प्रा. वैशाली वाटकर, प्रीती तिवाडे यांनी सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.