आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छोटी गुजरी परिसरातील घटना:दारूच्या बिलावरून वाद ; वाइन बारमध्ये बंदुकीतून हवेत गोळीबार

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दारूच्या बिलावरून झालेल्या वादात एका तरुणाला मारहाण करत वाइन बारमध्ये बंदुकीतून हवेत गोळी फायर करण्यात आली. ही धक्कादायक घटना शहरातील छोटी गुजरी परिसरातील एमपी जयस्वाल वाइन बारमध्ये शनिवार, ३ सप्टेंबरला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. प्रीतेश दिनेश जयस्वाल (३२) रा. छोटी गुजरी, यवतमाळ असे जखमी तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रोहित जाधव, कवट्या उर्फ अलीम शेख, नयन सौदागर, रिज्जू सयानी, नईम खान गुलाब नबी खान उर्फ नईम टमाटर, शेख इम्रान शेख सलीम उर्फ कांगारू आणि आद्या उर्फ आदेश खैरकार सर्व रा. यवतमाळ आदींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, शहरातील छोटी गुजरी येथील एमपी जयस्वाल बारमध्ये नेहमीप्रमाणे प्रीतेश जयस्वाल हा तरुण गेला होता. यावेळी बारमध्ये ६ ते ७ तरूण मद्यप्राशन करीत बसले होते. ते तरुण सायंकाळी ७ वाजता पासून बारमध्ये मद्यप्राशन करत असून नेहमीच पैसे न देता निघून जात असल्याची माहिती मॅनेजर श्याम धामंदे यानी प्रीतेश जयस्वाल यांना सांगितले. त्यामूळे प्रीतेश हा त्या तरुणांकडे गेला आणि दारूचे ६ हजार रुपये बिल झाले, ते पैसे द्या मला बार बंद करायचा असल्याचे सांगितले. यावेळी त्यातील रोहित जाधव याने ‘तु मुझे पैसे माग रहा है, पैहेचानता नही क्या’ असे म्हणून प्रीतेश याच्यासोबत वाद करायला सुरूवात केली. त्यामूळे प्रीतेश हा त्याचे काम करण्यासाठी त्या ठिकाणाहून निघून गेला. दरम्यान रात्री १०.३० वाजताच्या सुमारास प्रीतेश हा काउंटरवर उभा असतांना त्या सात तरूण त्या ठिकाणी आले.

यातील रोहित जाधव याने ‘तु बील के पैसे कैसे मांग रहा’ म्हणत मारहाण केली. त्यानंतर नयन सौदागर आणि कांगारू ‘तु आम्हाला पैसे मागतो, आता तुला जीवे मारून टाकतो’ म्हणत प्रीतेश याच्यावर चाकू उगारला. यात प्रीतेश याच्या नाकावर आणि तोंडावर चाकू लागल्याने तो जखमी झाला. तर आदेश खैरकार याने काठीने मारहाण केली. त्यानंतर रिज्जु सयानी आणि नईम टमाटर याने काचेचे ग्लास फेकून मारत चक्क बारमध्ये तोडफोड करण्यास सुरूवात केली. अश्यातच कवट्या उर्फ शेख अलीम याने थेट बंदूक काढून हवेत फायर करत ‘तुम मुझे पेहेचानते नही क्या’ म्हणत पैश्याची मागणी केली. दर महिन्याला ५ हजार रूपये हप्ता लागेल नाही जर जीवानिशी मारून टाकील, अशी धमकी दिली. त्यानंतर ते तरूण त्या ठिकाणाहून निघून गेले. घटनेची माहिती मिळतच परिसरातील नागरिकांसह शहर पोलिसांनी धाव घेतली. दरम्यान तातडीने प्रीतेश याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी प्रीतेश जयस्वाल यानी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्या सात जणांवर गुन्हे नोंद करत नईम टमाटर याला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...