आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंभीर बाब:जिल्हा रुग्णालयाच्या अपघात विभागात 2 गटांत सशस्त्र चकमक

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरात शुल्लक कारणावरुन एका डॉक्टरचा चाकुने भोसकुन खुन करण्यात आला. या घटनेवरुन सर्वत्र रान उठले होते. या घटनेची शाई वळते न वळते तोच थेट जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागात दोन गटात सशस्त्र चकमक झाली. सोमवार दि. ५ डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडलेल्या या घटनेने जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा यंत्रणेची लक्तरे पुन्हा ऐकदा वेशीवर टांगल्या गेली आहे.

दारव्हा मार्गावर झालेल्या भांडणामध्ये जखमी झालेल्या एका तरुणाला त्याचे मित्र मध्यरात्री दरम्यान जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी घेऊन येतात. त्या जखमीवर अपघात विभागा शेजारी असलेल्या शस्त्रक्रीया गृहात उपचार सुरू होतो. जखमीसोबत असलेले दोन युवक बाहेर बाकावर बसलेले असतात याचवेळी त्या ठिकाणी अचानक चार ते पाच युवक येतात आणि त्या दोघांना बेदम मारहाण सुरू करतात. यावेळी एक युवक चाकु काढुन वार करतो आणि अवघ्या काही वेळातच सर्वजण त्या ठिकाणावरुन पसार होतात. हा कुठल्या सिनेमाच्या कथानकाचा प्रकार नसुन सोमवारी मध्यरात्री दरम्यान जिल्हा रुग्णालयातील अपघात विभागामध्ये तेही घडलेली थरारक घटना आहे. रुग्णालयातील पोलिस चौकीच्या समोर घडलेला आणि रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असतानाही घटनेच्या दुसऱ्या दिवशी सायंकाळपर्यत रुग्णालय प्रशासन किंवा पोलिस प्रशासन यांच्याकडुन या प्रकारात कुठलीही कारवाई करण्यात आल्याचे दिसुन येत नाही. मात्र जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या या घटनेचा व्हीडीओ मंगळवारी समाज माध्यमावर व्हायरल झाला. त्यामुळे संपुर्ण शहरात दिवसभर या घटनेची चांगलीच चर्चा सुरू झाली होती.

दारव्हा मार्गावर असलेल्या एका ढाब्यावर बाभुळगाव आणि वाघापुर या परिसरातील दोन गट जेवण करीत होते. यावेळी काही शुल्लक कारणावरुन त्या दोन्ही गटामध्ये वाद सुरू झाला. ढाबा व्यावसायिकाने प्रसंगावधान राखत लगेच त्या दोन्ही गटातील युवकांना ढाब्याबाहेर काढुन ढाबा बंद केला. मात्र त्या दोन गटात त्यानंतरही वाद सुरूच होता. त्या वादातच जखमी झालेल्या युवकाला घेवुन एक गट जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी गेला होता. यावेळी त्या ठिकाणी दुसऱ्या गटातील युवकांनी जावुन हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. मात्र त्यानंतर जखमी युवकांसोबत मारहाण करणाऱ्यांनी जिल्हा रुग्णालयातुन पोबारा केल्याने हे युवक कोण होते आणि त्यांच्यात कुठल्या कारणावरुन वाद झाला याचा काहीही थांगपत्ता लागलेला नव्हता.

रुग्णालयात जखमींपैकी कुणीही दाखल नाही बाहेर घडलेल्या एका वादाच्या घटनेतील जखमी उपचारासाठी अपघात विभागात आला होता. त्या ठिकाणी अचानक आलेल्या युवकांनी मारहाण केली आणि काही कळायच्या आत ते पसार झाले. त्यानंतर जखमींपैकी कुणीही रुग्णालयात उपचारासाठी थांबले नाही. ते सर्व रुग्णालयात निघुन गेले. त्यामुळे ते कोण होते आणि वाद कशाचा होता याची माहिती नसल्याने रुग्णालय प्रशासनाने कुठलीही तक्रार केली नाही. डॉ. सुरेंद्र भुयार, अधीक्षक जिल्हा रुग्णालय

अद्याप तक्रारच दाखल नाही हा वाद दारव्हा मार्गावर सुरू झाला असल्याने या घटनेनंतर शहर पोलिस ठाण्यात आलेले युवक लोहारा पोलिस ठाण्यात जातो असे सांगुन निघुन गेले. मात्र त्यानंतर त्यांचा काहीही पत्ता लागलेला नाही. या प्रकरणात कुणाचीही तक्रार अद्याप दाखल झालेली नाही. त्यामुळे कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्या युवकांचा शोध घेण्यात येत आहे. नंदकुमार पंत, ठाणेदार, शहर पोलिस ठाणे

बातम्या आणखी आहेत...