आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनावरे दगावली:जिल्ह्यात लम्पी आजारामुळे तब्बल 77 जनावरे दगावली

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रामीण भागातील जनावरांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव वाढू लागला असून या आजारामुळे प्राण गमावणाऱ्या जनावरांचीही संख्या वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात चार हजार ८८० जनावरांना लम्पीची बाधा झाली असून त्यातील ७७ जनावरांना या रोगामुळे जीव गमवावा लागला आहे. त्यातील १५ जनावरांच्या मालकांना अनुदान सहायता निधी मंजूर झाला आहे. तर अद्यापही ६२ पशुपालक मदती पासून वंचित आहे.

जिल्ह्यात ९० टक्के जनावरांचे लसीकरण झाल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात लम्पीचा फैलाव झाला आहे. दारव्हा तालुक्यात सर्वाधिक जनावरांना लम्पीची बाधा झाली आहे. तर सर्वाधिक पशूचा मृत्यू नेर तालुक्यात झाला आहे. दिवसेंदीवस जनावरांच्या मृत्यूचा आकडाही झपाट्याने वाढत आहे. शासनाकडून मृत पशुधन पोटी अर्थसाहाय्य दिले जाते. त्यानुसार शासनाकडून प्रति गाई मृत्यू ३० हजार, तसेच बैल मृत झाल्यास २५ हजार तर प्रति वासरू १६ हजार रूपये अनुदान निश्चित आहे.

२२१ गावे आतापर्यंत लम्पीच्या विळख्यात सापडली. यात ७७ पशुधन दगावले तर दोन हजार ३८५ पशुधन बरे झाले. दोन हजार २७४ पशुधनावर उपचार सुरू आहेत. तर ६२ पशुपालक नुकसान भरपाई पासून वंचित आहेत. एकुण पाच लाख ९६ हजार ११३ जनावरांपैकी ५ लाख ३६ हजार ७१८ पशूंचे लसीकरण करण्यात आले आहे. लम्पी चर्म रोगामुळे जिल्ह्यातील पशू पालकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून नुकसान भरपाई ही फारच नगण्य आहे. पशुची किंमत तसेच त्यांना जगवण्यासाठी केलेला खर्च, औषधोपचार, चारा, वैरण याचही भरपाई या नुकसान भरपाईने होत नसल्याची प्रतिक्रिया पशूंपालकांकडून सांगण्यात येत आहे.

बाधित जनावराचे विलगीकरण महत्वाचे
बाधित जनावराचे कच्चे दुध वासराने सेवन केल्यास वासराला संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे दुभते जनावर बाधित असेल तर वासराला दूध पाजू नये. त्या वासराला बाटलीच्या माध्यमातून दूध पाजावे. वासराला बाधित पशू पासून विलग करून ठेवावे. या रोगाची लागण वासराला झाल्यास न्युमोनिया हाऊ शकतो. वासरांमध्ये मरतुकीचे प्रमाण अधिक राहु शकते. तसेच लम्पीचा संसर्ग टाळण्यासाठी इतर प्रतिबंधात्मक उपायांसह बाधित जनावराचे तत्काळ विलगीकरण करा.

१५ पशुपालकांना मिळाली नुकसान भरपाई
लम्पी आजाराने मृत्यू झालेल्या गुरांची नुकसान भरपाई म्हणून शासनाने निधी मंजुर केला आहे. याकरीता दुधाळ जनावरांकरिता ३० हजार रूपये, बैलाच्या मृत्यू साठी २५ हजार तर लहान गुरांसाठी प्रत्येकी १६ हजार नुकसान भरपाई दिल्या जात आहे. आतापर्यंत प्रशासनाकडे प्राप्त प्रस्तावापैकी केवळ १५ पशुपालकांना मदत देण्यात आली आहे. असे मृत झालेल्या जनावरांचे ७७ प्रस्ताव प्राप्त झाले आहे.

पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प
लम्पी हा पशुधनातील वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असला तरी पशुधन दगावण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. पशुपालकांनी सतर्क राहून काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गुरांची वेळीच काळजी घेतल्यास लम्पी आजाराची लागण होण्यापासून बचाव करता येतो.डॉ. क्रांती काठोले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

बातम्या आणखी आहेत...