आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाबे दणाणले:एकाच दिवशी सहा थकबाकीदारांच्या सव्वा दोन कोटींच्या मालमत्ता जप्त

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरबीआयने बँकिंगचा परवाना रद्द केल्यानंतर बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर अवसायक म्हणुन जिल्हा उपनिबंधक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बँकेच्या कुठल्याही ठेवीदारांचे पैसे बुडू नये यासाठी कठोर पाउले आता उचलण्यात येत आहे. त्यात शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी एकाच दिवशी तब्बल सहा थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची धडक कारवाई अवसायकांकडून करण्यात आली.

या मालमत्तांची किम्मत सव्वा दोन कोटींच्या घरात आहे अशी माहिती अवसायकांनी दिली सामतत्याने अनियमितता आढळुन आल्याने रिझर्व बँकेने ११ नोव्हेंबर पासून बाबाजी दाते महिला सहकारी बँकेचा परवाना रद्द करण्यात आला. या आदेशामुळे बँकेचे हजारो सभासद आणि नवे संचालक मंडळ हादरून गेले. दरम्यान जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांची बँकेच्या अवसायक पदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी बँकेच्या सभासदांचे पैसे कुठेही बुडणार नाही याची दखल घेत तातडीने बँकेच्या थकबाकीदारांकडुन वसुली करण्यासाठी धडक मोहिम हाती घेतली आहे.

त्यात शनिवार दि. १९ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात यवतमाळ आणि कळंब येथे असलेल्या सहा थकबाकीदारांच्या सुमारे २.२४ कोटी रुपये किमतीच्या मालमत्ता जप्त केल्या. त्यात ३ घरे, १ शेत आणि २ खुले भूखंड यांचा समावेश आहे. या मालमत्ता जप्त केल्यानंतर मालमत्तांमध्ये बँकेच्या जप्तीचे फलक आणि नोटीस लावण्यात आली आहे. अवसायकांनी इतक्या तातडीने बँकेच्या थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीचा धडाका सुरू केल्याने कुणालाही सवलत मिळणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने बँकेच्या थकबाकीदारांचे मात्र चांगलेच धाबे दणाणले आहे.

सन १९९५ मध्ये शिक्षण व सहकार महर्षी बाबाजी दाते यांनी सुरू केलेल्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेच्या सध्या मुख्य कार्यालयासह एकूण २० शाखा कार्यरत आहेत. त्या यवतमाळसह वर्धा, चंद्रपुर, अमरावती आणि नांदेड या ठिकाणी पसरल्या आहेत. बँकेजवळ सध्या ४८६ कोटी रूपयांच्या ठेवी असून, कर्जवाटप ३३० कोटीचे आहे. सध्याची सभासद संख्या सात हजार ९९१ आहे. तर ग्राहकांची संख्या ३६ हजार आहे. मध्यंतरी दाते यांच्या निधनानंतर बँकेत मनमानी पद्धतीने कर्जवाटप झाले. त्यात मोठ्या अफरातफरी केल्या.

बँकेतील मोजक्या कर्जदारांकडे १९७ कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. ही रक्कम बँकेने दिलेल्या एकुण कर्जाच्या निम्म्याहून अधीक आहे. इतर कर्जदारांचे ३५० कोटींपेक्षा जास्तीचे कर्ज आहे. दरम्यान आरबीआयने विड्रॉल वर निर्बंध लादले. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ९ नोव्हेंबर रोजी बँकेचा परवानाच रद्द करण्याचे आदेश दिले. त्यानंतर बँकेवर अवसायक नेमण्यात आले आहेत. त्यांनी आता थेट मालमत्ता जप्तीचा धडाका लावल्याने थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाई दरम्यान अवसायक नानासाहेब चव्हाण यांच्यासह जिल्हा विशेष लेखापरीक्षक जगदीश गवळे, सहा. सहकार अधिकारी शैलेश मडावी आणि बँकेचे प्राधिकृत अधिकारी उपस्थित होते.

अर्जासाठी १६ जानेवारीची मुदत
बाबाजी दाते महिला बँक अवसायनात निघाल्यामुळे बँकेच्या ठेवीदारांची चिंता वाढली आहे. त्यांना त्यांच्या ठेवीचे पैसे परत मिळावे यासाठी क्लेम करावा लागणार आहे. या क्लेमसाठी १६ जानेवारी २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत अवसायकांकडून देण्यात आली आहे. बँकेमध्ये ठेवीदारांच्या १८५ कोटींच्या ठेवी अडकल्या आहेत.

लॉकरमधील साहित्य नेण्यास मुभा
बाबाजी दाते महिला बँकेचा परवाना रद्द झाल्याची माहिती होताच बँकेचे सभासद आणि ठेवीदार यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यातही बँकेमध्ये असलेल्या लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या साहित्याचे काय असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र बँकेचे कर्ज नसणाऱ्या लॉकर धारकांना त्यांच्या लॉकरमध्ये असलेले साहित्य काढुन घेण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यासाठी त्यांना लॉकरचे थकीत भाडे भरावे लागणार आहे. त्यामुळे या लॉकर धारकांना दिलासा मिळाला आहे.

तत्कालीन संचालकांची चौकशी सुरू
बँकेत झालेल्या अपहार प्रकरणात न्यायालयाने आदेशावरून अवधुतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात तत्कालीन संचालक मंडळ, तत्कालीन मुख्याधिकारी, प्राधीकृत अधिकारी, शाखा व्यवस्थापक, भागीदार यांचा समावेश आहे. या सर्वां विरुद्ध गुन्हे दाखल झाल्यानंतर आता पोलिस प्रशासनाने या प्रकरणात चौकशी सुरू केली आहे. त्यात सर्वप्रथम बँकेच्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

वसुलीत कुणालाही मुभा नाही
बँकेचे कर्ज थकविणाऱ्या प्रत्येकाकडून ती रक्कम वसूल करण्यात येणार आहे. त्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्तीची मोहिम सुरू करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेल्या मालमत्ता आठ दिवसानंतर लगेच लिलाव करण्याची प्रक्रीया सुरू होईल. त्यामुळे बँकेच्या थकबाकीदारांनी आपणहुन पुढे येत बँकेच्या थकबाकीचा भरणा करावा.नानासाहेब चव्हाण, अवसायक, बाबाजी दाते महिला सहकारी बँक,

बातम्या आणखी आहेत...