आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हेवृत्त:चाकूने पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या मदतीने वाचले प्राण

यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादात पतीने पत्नीवर चाकू हल्ला करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना शहरातील संकटमोचन परिसरात गुरूवार, दि. १५ जुनला सकाळी ६.१५ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती अवधुतवाडी पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रथम महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केल्याने त्या महिलेचे प्राण वाचले. पार्वती प्रकाश इंगळे वय २६ वर्ष रा. संकटमोचन परिसर, यवतमाळ असे जखमी महिलेचे नाव असून या प्रकरणी पोलिसांनी हल्लेखोर पती प्रकाश इंगळे वय ३२ वर्ष याला ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणी पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनूसार, अकोला जिल्ह्यातील दहेगाव गावंडे येथील प्रकाश इंगळे आणि त्याची पत्नी यवतमाळातील संकटमोचन परिसरात राहायला आले होते. त्यानंतर काही महिन्यातच प्रकाश आणि पार्वती यांच्यात वाद सुरू झाले. त्यामूळे दोघेही वेगवेगळे राहत होते. अश्यात शुक्रवारी रात्री प्रकाश हा पत्नी पार्वती हिच्या रूमवर आला होता. त्या ठिकाणी दोघांमध्ये सोबत राहण्यावरून वाद निर्माण झाला. दरम्यान गुरुवारी पहाटेच्या सुमारास प्रकाश याने रागाच्या भरात पत्नीच्या गळ्यावर चाकूने आणि लोखंडी तव्याने वार करीत जिवे मारण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पार्वती हिने आरडाओरड केल्याने परिसरातील नागरिकांनी धाव घेत अवधुतवाडी पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता सहायक पोलिस निरीक्षक राहुल शेजव, कर्मचारी रूपेश ढोबळे यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. यावेळी पार्वती ही रक्ताच्या थारोळ्यात तडफडत दिसल्याने पोलिसांनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी देखील तिच्यावर लगेच उपचार सुरू केल्याने अखेर तिचे प्राण वाचले. या प्रकरणी हल्लेखोर पती प्रकाश इंगळे याला पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हे नोंद केले आहे. पुढील तपास ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दर्शन दिकोंडवार करीत आहे.

बातम्या आणखी आहेत...