आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबाळासाहेब देशमुख सवनेकर हे सामर्थ्याला संवेदनशीलतेची जोड देणारे व्यक्तीमत्व होते, असे प्रतिपादन माजी जि. प. सदस्य भोलेनाथ कांबळे यांनी केले. ते लोकनेते व सहकार महर्षी बाळासाहेब देशमुख सवनेकर यांचा २८ वा स्मृतिदिन जि. प. प्रा. शाळा, वडसद तांडा येथे शुक्रवार, दि. ३० डिसेंबरला आयोजित मोफत रक्तगट, दंतरोग तपासणी व लेखन साहित्य वाटप कार्यक्रम प्रसंगी बोलत होते.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गावच्या सरपंच सुषमा राठोड, ग्रामपंचायत सदस्य बळीराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते साहेबराव राठोड, प्रसिद्ध दंतरोग तज्ज्ञ डॉ. गजानन धबडगे, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी उत्तम चव्हाण, केंद्र प्रमुख अमृतराव देशमुख, संवेदना सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष किरण देशमुख सवनेकर, आर्या लॅबचे संचालक डॉ. संजय पडोळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोहर जाधव, राजेश राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब देशमुख सवनेकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले.मान्यवरांचे स्वागत पुस्तके देउन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या निरोगी आयुष्यासाठी आकांक्षा भिसे व क्रिष्णा आंबोरे ह्या विद्यार्थ्यांनी योगासनांचे प्रात्यक्षिक करुन दाखविले. यानंतर साहेबराव राठोड व उत्तम चव्हाण यांनी बाळासाहेब देशमुख सवनेकर यांच्या जीवन चरित्र्यावर प्रकाश टाकून त्यांनी केलेल्या सामाजिक कार्याला उजाळा दिला.
यानंतर संवेदना सोशल फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात दंतरोग तज्ज्ञ डॉ. गजानन धबडगे यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करुन सर्व विद्यार्थ्यांना टुथपेस्ट व ब्रश मोफत दिले. त्यांना आयुर्वेदाचार्य डॉ. वैभव धबडगे व फार्मासिस्ट गिरीश बोडखे यांचे सहकार्य लाभले. आर्या लॅबचे संचालक डॉ. संजय पडोळे, इंगळे व त्यांच्या टीमने रक्तगट तपासणी केली. सर्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत लेखन साहित्याचे वितरण केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक एस.ए.राठोड यांनी केले.प्रास्ताविक मुख्याध्यापक एस.बी.जामगडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संवेदना सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी स्वप्निल देशमुख, हरगोविंद कदम, जितेंद्र चिद्दरवार, मोहन बोजेवार, गिरधर ठेंगे, हरिभाऊ ठाकरे, शिवाजी कदम यांच्यासह शाळा व्यवस्थापन समितीचे अनिल जाधव,मंगल चव्हाण,कमल चव्हाण,सुशीला भिसे व विद्यार्थी मंडळाने पुढाकार घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.