आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी त्रस्त:शेतकऱ्यांनी रोखल्या घंटागाड्या ; डम्पिंग ग्राउंडवर साठवलेला कचरा शेतात येत असल्याने शेतकरी त्रस्त

दिग्रसएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिग्रस तालुक्यातील निंभा शेत शिवारात दिग्रस नगर पालिकेने करोडो रुपये खर्च करून डम्पिंग ग्राउंड तयार केले. शहरातील कचरा ट्रॅक्टर व घंटा गाड्याच्या सहाय्याने वाहून नेऊन या डम्पिंग ग्राउंड मध्ये टाकला जातो. त्या डम्पिंग ग्राऊंडला केवळ तारेचे कंपाउंड असून तेथील साठवलेला कचरा उडून शेतकऱ्यांच्या शेतात आणि विहिरीत जातो. त्यामुळे मागील चार वर्षांपासून शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान होत असल्याचे निवेदन वारंवार देण्यात आले आहे. मात्र त्याला केराची टोपली दाखविण्यात येत असल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने मंगळवार दि. ७ जुन रोजी थेट डंपिंग स्टेशनमध्ये जाणाऱ्या कचऱ्याच्या घंटागाड्या आणि ट्रॅक्टर रोखून आंदोलन केले. हिरा बाळापूरे, पुंडलिक थोरात, वंदना शिंदे अशी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आहे. डंपींग ग्राउंड मधील कचरा त्यांच्या शेतात आणि विहिरींमध्ये उडुन जातो. त्यामुळे मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागत असुन या शेतकऱ्यांनी त्यासंदर्भात चार वर्षात वेळोवेळी नगर परिषदेला निवेदन देऊन सुद्धा यांच्या निवेदनाला नगर परिषदेने केराची टोपली दाखवली. कोणतेच ठोस पाऊल त्यासंदर्भात उचलले नसल्याने अखेर संबंधित शेतकऱ्याने डम्पिंग ग्राउंड मध्ये कचरा टाकणाऱ्या ट्रॅक्टरसह घंटागाड्या थांबवून डम्पिंग ग्राउंड ची सुधारणा करून न्याय मागण्यासाठी आंदोलन केले. नगर परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता गौरव मांडळे व आरोग्य निरीक्षक कैलास कलोसे यांना कचऱ्याच्या गाड्या शेतकऱ्यांनी अडवल्याचे कळताच घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र त्यांनी संबंधित शेतकऱ्यांशी कोणतीच चर्चा केली नाही तसेच सदर शेताची पाहणी देखील केली नसल्याचे शेतकऱ्याने सांगितले. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत येथून हटणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला आहे.

बातम्या आणखी आहेत...