आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:भोजल्याचा परंपरागत 125 वर्षांचा माडीवरचा गणपती; शेंदूर लावून त्याची विधिवत केली जाते स्थापना

पुसद19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

काशी तीर्थक्षेत्री देवदर्शनाला गेल्यानंतर नागावर बसलेली पंच धातूची गणपती मूर्ती यवतमाळ येथील रहिवाशी कै. ज्ञानोबा नारायण पेन्शनवार यांना सापडली होती. ती मूर्ती बसवून माडीवरचा गणपती म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. तालुक्यातील भोजला येथे सन १८९७ साली ट्रस्टचे अध्यक्ष तुकाराम ज्ञानोबा पेन्शनवार, सचिव सोपानदेव ज्ञानोबा पेन्शनवार यांनी सर्वांत पहिले मूर्तीची प्रतिष्ठापना केली. मागील १२५ वर्षांपासून वंशपरंपरागत शेतातील मातीचा गणपती तयार करून शेंदूर लावून त्याची विधिवत स्थापना करून सकाळी, सायंकाळी नित्यनियमाने पारंपारिक पद्धतीने आजही आरती केली जाते.

दहा दिवसाच्या गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये भजने, किर्तने, व्याख्यान धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते. पूर्वी आजूबाजूचे ५ गावातील व भोजला येथील संपूर्ण गावकरी लोकांना गाव जेवण होत असे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, श्री संत अच्युत महाराज, कौडण्यपूर, प्रा. डबीर नागपूर, प्रा. अप्पामार्जने यांचे किर्तन, पुसद येथील प्रसिद्ध कै. विठ्ठलराव महाजन, उद्धव कासार, (धुमाळे) यांची भारुडे, अनेक विचारवंताचे प्रबोधन होत होते. सन १९९२ मध्ये कै. ज्ञानोबा नारायण पेन्शनवार या नावाने ट्रस्ट स्थापन करून श्री सिद्धी विनायकाच्या मूर्तीची स्थापना केली. त्या मंदिरातच गणेशोत्सवाच्या दहा दिवसांसाठी मातीच्या गणेशाची स्थापना करून गणेशोत्सव साजरा होत आहे.

गणेश जयंती, गणेशोत्सव हे दोन सण अनेक भाविक भक्तांच्या उपस्थितीत साजरे होतात. माडीवरचा गणपती नवसाला पावतो म्हणून अनेक भाविक आपली मनोकामना पूर्ण करतात. मनोकामना पूर्ण झाल्यावर नवसही फेडण्यासाठी भाविक येतात. ट्रस्टचा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आजही संपूर्ण पेन्शनवार परिवार परिश्रम घेत आहेत.

विसर्जनाच्या दिवशी पालखीने निघते मिरवणूक
पुसद येथील विश्व हिन्दू परिषदेच्या वतीने मागील २१ चतुर्थीच्या दिवशी महिलांनी आपली नियमित भजन-सेवा केली. भोजला गावात २ पुरुष आणि ८ महिला भजनी मंडळे असून, ती आपली सेवा देतात. गणेश विसर्जनाच्या दिवशी पालखीने गणेशाची मिरवणूक निघते. त्यात भजनी मंडळ, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित राहातात.

बातम्या आणखी आहेत...