आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा१९०९ साली ब्रिटिश इंजिनिअर मिस्टर एडवर्ड यांच्याद्वारे सर्व्हे करून अभियंता थोरपे यांच्या मार्गदर्शनात शकुंतला रेल्वे मार्गाची पायाभरणी झाली होती. अवघ्या चार वर्षात रेल्वे स्टेशन, पूल, पटरी, विहिरी, झाडे लावून १९१३ साली शकुंतला रेल्वे मार्गावर पहिली रेल्वे मालगाडी धावली होती. १ जानेवारी १९१४ रोजी पहिली प्रवासी गाडी धावली. हे औचित्य साधून दर्यापूरातील बनोसा रेल्वे स्थानकासमोर, रेल्वे स्थानकांची स्वच्छता करून, शकुंतला रेल्वेचा केक कापून ११० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रही विजय व्हिल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले होते.
‘शंकुतला गाडी सुरू झालीच पाहीजे’, ‘शंकुतला गाडी है गरीबो और व्यापारीओ की नाडी’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता या प्रसंगी शकुंतला रेल्वे आहे त्या स्थितीत सुरू करा, असा सर्व सत्याग्रहींनी निर्धार व्यक्त केला. दर्यापूर येथील कार्यक्रमात आमदार बच्चू कडू यांच्याप्रती मालिनी पाटील यांनी अभिनंदन प्रस्ताव मांडला. या वेळी मनोज रेखे, नम्रता शहा, संगीता पुंडे, संघमित्रा खंडारे यांनी शकुंतला रेल्वे गोरगरीब, दिनदुबळ्या आदिवासी, कष्टकरी, शेतकऱ्यांची जीवनवाहीनी आहे हे प्रभावीपणे विशद केले.
दरम्यान सत्याग्रही विजय विल्हेकर यांनी शकुंतला रेल्वेच्या मालकी संदर्भात संविधानिक अनेक प्रश्न निर्माण केले. एखादे मूलभूत दळणवळणाचे साधन, नागरिकांच्या अनुमतीशिवाय रेल्वे विभागाला बंद करता येते का, असा शकुंतला रेल्वे प्रवाशांच्या मूलभूत अधिकाराचा प्रश्न उपस्थित केला. या संदर्भात उच्च न्यायालयात जाण्याचेही मत व्यक्त करण्यात आले. या प्रसंगी दीपक शर्मा, गजानन देवतळे, सुनीता मंडवे, रामदास चव्हाण, गजानन देवके, जनार्दन गावंडे, शेखर पाटील रेखे, सुनील साबळे, दिनेश मोहता, गोपाल तराळ, माधव देशमुख, श्याम कावडकर, प्रदीप पंपालिया, विजय कावरे, संतोष गायकी, दीपक नेतकर, मनोज तायडे, पंकज कदम, अनिल काळे, विश्वास काळे आदी सत्याग्रहींनी सहभाग घेतला. शेवटी डॉ. विठ्ठल वाघ रचित शकुंतला भजनांनी या शकुंतला रेल्वेच्या वाढदिवसाचा समारोप करण्यात आला. केक कापून शकंुतला रेल्वेचा वाढदिवस साजरा करताना विजय विल्हेकरांसोबत उपस्थित अन्य.
घोषणांनी दुमदुमला परिसर या प्रसंगी शकुंतला रेल्वेला ११० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शकुंतला रेल्वेचा सत्याग्रहांकडून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी शकुंतला गाडी आहे त्या परिस्थितीत सुरू करण्याची मागणी करीत शंकुतला गाडी सुरू झालीच पाहिजे, शंकुतला गाडी है गरीबो और व्यापारीओ की नाडी असा जयघोष केला. या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.