आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात पुन्हा चोरट्यांनी डोके वर काढले असून वडगाव आणि वाघापूर परिसरात घरफोड्या करत लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या घटना शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्या. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात विविध कलमान्वये गुन्हे नोंदवत त्यांचा शोध सुरू केला आहे.
प्राप्त माहितीनूसार, यवतमाळ वाघापूर परिसरातील सावित्रीबाई फुले सोसायटीतील रहिवासी अरुण सरागे कुटुंबीयांसह काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. अशात रविवारी पहाटेच्या सुमारास त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आता चोरट्यांनी आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील कपाटात असलेली जवळपास ४० हजाराची रोख व इतर साहित्य लंपास करीत पळ काढला. ही बाब परिसरातील नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी लोहारा पोलिसांना याबाबत माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. या प्रकरणी वृत्त लिहिपर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झालेला नव्हता.
शहरातील सत्यनारायण ले-आऊटमधील रहिवासी नितीन कांबळे शुक्रवारी दुपारी वर्धा जिल्ह्यातील बाभुळगाव येथे काही कामानिमीत्त कुटुंबीयांसह गेले होते. त्यानंतर रात्रीच्या सुमारास ते काम आटपून परत यवतमाळ येथील घरी आले. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेले आढळून आले. दरम्यान त्यांनी घरात प्रवेश करून पाहणी केली असता, संपूर्ण साहित्य अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. तसेच कपाटातील लॉकरमध्ये असलेली एक लाख ६० हजार रुपयांची रोख आणि दहा तोळे चांदीचे दागिने असा एकूण एक लाख ६५ हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कांबळे यांनी अवधुतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत.
चोरट्यांनी तरुणावर केली दगडफेक; नागरिकांमध्ये दहशत
सावित्रीबाई फुले सोसायटीतून घरफोडी करणारे चोरटे काही तरुणांना आढळून आले. यावेळी तरुणांनी त्याच्या मागे धाव घेत आरडाओरड केली. त्यावेळी चोरट्यांनी चक्क तरुणावर दगडफेक केली. यात एक तरूण किरकोळ जखमी झाले आहे. या चोरट्यांचा लोहारा पोलिस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून शोध घेत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.