आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅली:जिल्हा बाल संरक्षण कक्षाद्वारे बालविवाह जनजागृती रॅली; समाजात जनजागृती व्हावी म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते

यवतमाळ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात इतर समस्या सोबत समाजात बाल विवाहाची संख्या वाढलेली दिसून येत आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून तसेच अक्षय तृतीया या मुहूर्तावर होणाऱ्या बाल विवाहाची संख्या विचारात घेऊन शासकीय निर्देशानुसार महिला व बाल विकास विभागाद्वारे विविध जनजागृतीपर उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, यवतमाळ, आशादिप सामाजिक संस्था व नगर परिषद शाळा क्र. ६ यांच्या द्वारे अक्षय तृतीया व त्यानंतरच्या शुभ मुहूर्तावर होणारे बालविवाह होऊ नये व समाजात जनजागृती व्हावी म्हणून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, चाईल्ड लाईन, आशादिप सामाजिक संस्था व न. प. शाळा क्र. ०६ पाटिपुरा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सामाजिक गीताच्या व बाल विवाहपर पथनाट्ये व घोषवाक्याचा माध्यमातून समाजात १८ वर्षाखालील मुलगी व २१ वर्षाखालील मुलगा यांचा विवाह करणे अजामीनपात्र व दखलपात्र गुन्हा आहे असा संदेश यावेळी देण्यात आला.

यावेळी अॅड. प्राची निलावार, अध्यक्ष बाल कल्याण समिती व गजानन जुमळे, अधीक्षक शासकीय मुलांचे बालगृह यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीची सुरुवात केली. समारोपप्रसंगी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांच्याद्वारे आम्ही बाल विवाह करणार नाही व बाल विवाह होत असेल तर त्याबाबत तात्काळ माहिती प्रशासनास व चाइल्ड हेल्प लाइन वर देऊ” याबाबत शपथ वाचन करण्यात आली. सदर रॅलीचे आयोजन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडू यांच्या मार्गदर्शनात जिल्हा बाल संरक्षण कक्ष यांनी केले. यावेळी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे देवेंद्र राजूरकर, अविनाश पिसुर्डे, स्वप्निल शेटे, सुनील बोक्से, चाईल्ड लाईनचे गायत्री उर्कुटकर, दिलीप दाभाडेकर, गणेश आत्राम, मुख्याध्यापक करुणा खैरे, शिक्षक, नागरिक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...