आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन:मुख्याधिकारी माधुरी मडावी यांच्या समर्थनार्थ नागरिक जिल्हा कचेरीवर

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगरपालिका मुख्याधिकारी तथा प्रशासक माधुरी मडावी यांची बदली करण्यात आल्याची चर्चा समाज माध्यमावर जोरात सुरु आहे. मडावी यांच्या बदली मागे राजकीय कारण असल्याचेही बोलल्या जात आहे. पालिका मुख्याधिकार्‍यांची बदली करू नये, या मागणीसाठी सोमवार, दि. १२ सप्टेंबरला यवतमाळकर नागरिकांनी बसस्थानक चौकात एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी काहींनी बदली करणार्‍यांचा निषेध नोंदवत सतीश बोरकर पाटील याने मुंडण केले. तर काहींनी आत्मदहनाचा प्रयत्नही केला.

मुख्याधिकारी माधुरी मडावी वर्षभर्‍यांपर्वी रुजू झाल्या आहे. या काळात त्यांनी कचरा तसेच स्वच्छतेचा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला. एक कर्तबगार अधिकारी म्हणून त्यांची जनमानसात आपली ओळख निर्माण केली आहे. असे असतानाही त्यांच्या बदलीचे अचानक चर्चा सुरु झाली आहे. गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमावर राजकीय बदली करण्यात आल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. त्यामुळे शहरातील आदिवासी समाज बांधव, सामाजिक संघटना, नागरिकांनी या बदलीचा निषेध नोंदवला आहे. त्यांची बदली करु नये या मागणीसाठी सोमवारी बसस्थानक चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चा काढण्यात आला.

शहराचा चेहरामोहरा बदलण्यात मुख्याधिकारी मडावी यांचा मोठा वाटा आहे. मडावी यांनी अनेक बाबतीत चांगले निर्णय घेतले आहे. अतिक्रमण, स्वच्छता, नाले सफाई, कर्मचार्‍यांना शिस्त लावणे, शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण अशा अनेक नागरिकांच्या हितांच्या बाबीकडे मुख्याधिकार्‍यांनी लक्ष दिले. असे असतानाही त्यांची राजकीय बदली करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याविरोधात काँग्रेसनेही मुख्याधिकारी मडावी यांच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेत त्यांना मडावी यांची बदली करु नये, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी चंद्रशेखर चौधरी, प्रा. बबलू देशमुख, विशाल पावडे, छोटू सवाई, ओम तिवारी, जावेद अन्सारी, उमेश इंगळे, उषा दिवटे यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...