आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारवाई सुरू:शहर वाहतूक शाखा अॅक्शन मोडवर; चौका-चौकात तपासणी, मद्यप्राशन करून वाहन चालवणे अनेकांना भोवले

यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सोमवारी क्राईम मिटींगमध्ये कामकाजात सुधारणा करण्याची तंबी दिल्यानंतर वाहतूक शाखा ॲक्टिव्ह झाली. अधीक्षकांनी खडसावल्यामुळे शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेची पथके ॲक्शन मोडमध्ये आली असून वाहन तपासणीसह बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरू केली.

शहरातील बेशिस्त वाहतूक व वाहतूक शाखेच्या ढिसाळ कारभार प्रकरणी शहरवासीयांमधून तक्रारी वाढत होत्या. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी सोमवारी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, वाहतूक शाखेच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कामकाजात सुधारणा करण्याची तंबी डॉ. बन्सोड यांनी दिली होती. पोलिस अधीक्षकांनी तंबी दिल्यानंतर शहर वाहतूक शाखा ॲक्टिव्ह झाली. शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेच्या पोलिस कर्मचाऱ्यांकडून वाहनांची तपासणी सुरू झाली. विना परवाना वाहन चालवणारे, बेशिस्त रित्या पार्किंग करणारे, ट्रिपल सीट फिरणाऱ्या वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली. शहरात विविध ठिकाणी वाहतूक शाखेची पथके ॲक्शन मोडमध्ये आली असून वाहन चालकांचे धाबे दणाणले आहे.

मद्यप्राशन करून वाहन चालवणे अनेकांना भोवले
शहरात वाहतूक शाखेने मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला. बुधवारी सकाळपासूनच शहराच्या प्रमुख रस्त्यावर वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. वाहतूक पोलिसांच्या पथकांनी अनेक मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली. या प्रकरणी विविध पोलिस ठाण्यात गुन्हे नोंद करण्यात आले आहे.

एलसीबीकडून डिटेक्शनवर भर
गेल्या काही महिन्यापासून स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाया थंडावल्या होत्या. मात्र काही दिवसापासून स्थानिक गुन्हे शाखेने गुन्हे उघडकीस आणण्याचा सपाटा लावला आहे. अनेक वर्षापासून अनडिटेक्ट गुन्हे उघडकीस आणण्यावर स्थानिक गुन्हे शाखेकडून भर दिल्या जात आहे. दोन दिवसात तीन गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेसह सायबर सेलला यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...