आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दबावतंत्र:जिओ टॅगिंग अटेंडन्ससाठी समुदाय आरोग्य अिधकाऱ्यांची नौटंकी

अमोल शिंदे | यवतमाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रात कार्यरत समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी (सीएचओ) जिओ टॅगिंग अटेंडन्स लागू करू नये, यासाठी प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केला होता. हा प्रकार मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी हाणून पाडला असून, जिओ टॅगिंग अटेंडन्स अनिवार्य केली आहे. यासंदर्भात नियमित रिपोर्ट दाखल करावा, अशाही सूचना सीएचओंना दिल्या आहेत. शेवटी सीएचओंची नौटंकी संपुष्टात आल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.

जिल्ह्यातील आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची ४०२ पदे मंजूर झाली आहे. सध्या ३४५ ठिकाणी समुदाय आरोग्य अधिकारी वैद्यकीय सेवा पुरवत आहेत. बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रातही डॉक्टर म्हणूनच ते जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. यात प्रामुख्याने गरोदर माता तपासणी, समुपदेशन, उपचार तसेच अतिजोखमीच्या माता शोधणे, त्यांना उपचार देणे, ज्येष्ठ नागरिकांची उच्च रक्तदाब, मधूमेह, कर्करोग आदी तपासण्या करणे, कुपोषाणग्रस्त बालके शोधण्यासह त्यांना संदर्भीय सेवा देणे, केंद्र, राज्य सरकारने निर्गमित केलेल्या मोहिमा, योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागात करण्याची जबाबदारी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांवर सोपवलेली आहे. यासाठी सीएचओंना सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत कर्तव्य बजावण्याचे निश्चित केले आहे.

परंतु बहुतांश सीएचओ वेळेचे पालन व्यवस्थितरीत्या करत नाहीत. परिणामी, रुग्णांना संदर्भीय सेवा मिळत नाही. ही बाब जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसह इतरही प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या भेटीदरम्यान उघडकीस आली आहे. त्यामुळे समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना जिओ टॅगिंग अटेंडन्स अनिवार्य केले.

बाह्यरुग्ण तपासणी करण्यासाठी उपकेंद्रात गेल्यानंतर सकाळी ८.३० वाजता जीपीएस मॅप कॅमेऱ्याच्या अॅपच्या माध्यमातून लोकेशन ऑन करून स्वत:चा फोटो सकाळी ११ वाजेपर्यंत व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकावा, असे निर्देश दिले होते. तर सायंकाळीसुद्धा ६ वाजेपर्यंत ही प्रक्रिया करावी, अशा सूचना दिल्या होत्या. या सूचनांचे पालन करताना समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळे प्रशासनावर दबावतंत्राचा वापर त्यांनी केला.

तब्बल पाच दिवस यवतमाळ तालुक्यातील सीएचओंनी कामबंद आंदोलन केले. या आंदोलनाची दाखल घेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्याशी चर्चा केली. आणि जिअाे टॅगिंग अटेंडन्स अनिवार्यच असल्याचे स्पष्ट संकेत दिले. यासंदर्भात कुठलीही हयगय करू नये, असे आदेश सीएचओंना दिले. या आदेशामुळे सीएचओंच्या नौटंकीवर पडदा पडला.

प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा बायोमेट्रिक
जिल्ह्यातील सर्वच प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची हजेरी बायोमेट्रिक प्रणालीतून घेतली जाणार आहे. त्या अनुषंगाने जिल्हा परिषद आरोग्य विभागाने नियोजन केले आहे. काही ठिकाणी बायोमेट्रिक लावले आहे. तर काही ठिकाणी नेटवर्कसह इतर समस्या निर्माण झाल्या आहेत. मात्र, यावर तोडगा काढला जाणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

झेडपीत कर्मचाऱ्यांची इन कॅमेरा अटेंडन्स
जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांच्या बायोमेट्रिक मशीनचा विषय गेल्या काही महिन्यांपासून धूळखात पडून आहे. आता मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यात लक्ष घातले असून, सध्या जिल्हा परिषदेतील काही विभागात लावण्यात येणाऱ्या थम्ब मशीन्स इन कॅमेऱ्यात राहणार आहे. डिसेंबर अखेरपर्यंत या मशीन्स लावण्यात येणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली आहे.

ऑनलाइन अटेंडन्स आवश्यक आहे
आरोग्यवर्धिनी केंद्रातील संदर्भीय सेवांची जबाबदारी समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांकडे आहे. हे काम करताना नियमित ऑनलाइन अटेंडन्स त्यांना द्यावी लागणार आहे. ऑनलाइन अटेन्डन्सच्या अनुषंगाने सीएचओंची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे चर्चा पार पडली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनीसुद्धा ऑनलाइन अटेंडन्स अनिवार्यच असल्याचा निर्वाळा दिला.-डॉ. प्रल्हाद चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी, यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...