आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शासन निर्णयात स्पष्टता नसल्याची ओरड:पालिकेच्या प्रभागरचनेवरुन इच्छुकांसह नेत्यांमध्ये संभ्रम

यवतमाळ6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर पालिकेच्या नवीन प्रभाग रचनेनुसार आरक्षणाची सोडत काढण्यात येवुन त्याची अंतीम अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान शासनाने जिल्हा परिषद, महानगर पालिकांच्या निवडणुका या जुन्या प्रभाग रचनेनुसार होणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. यामध्ये नगर पालिकांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला नसला तरी पालिकेच्या प्रभागरचनेवरुन इच्छुकांसह नेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला पहावयास मिळत आहे.

जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी, उमरखेड, पुसद, दिग्रस आणि दारव्हा या आठ नगर पालिकांची मुदत संपल्याने त्या ठिकाणी सार्वत्रीक निवडणुक होवु घातल्या आहेत. या सर्व नगर पालिकांमध्ये नव्याने प्रभाग रचना करण्यात आली असुन त्या नुसार मतदार याद्या आणि आरक्षणाची सोडत काढण्यात आली आहे. आरक्षण सोडतीसंदर्भात अंतीम अधिसूचनाही जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. निवडणुकीसंदर्भात हालचाली सुरू होताच नगर पालिकेच्या राजकारणात नशीब आजमावण्यासाठी उत्सुक असलेल्या इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर इच्छुकांच्या तयारीला वेग आला होता तर विविध पक्षाची नेतेमंडळीही नगरपालिका काबीज करण्यासाठी सरसावलेली होती.

दरम्यान नुकत्याच झालेल्या राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महानगर पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका २०१७ च्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात याव्या असा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जुन्या प्रभाग रचनेनुसार पार पडणार असल्याने नव्या प्रभाग रचनेनुसार करण्यात आलेल्या मतदार याद्या, प्रभाग रचना आणि आरक्षण या सर्वांना स्थगिती मिळाली आहे. या निर्णयामध्ये नगरपालिकांच्या निवडणुकीसंदर्भात उल्लेख करण्यात आलेला नाही किंवा त्यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधीसुचनेमध्येही तसा उल्लेख नाही. असे असले तरी नगर पालिकांच्या निवडणुक क्रीयेसंदर्भातही असा निर्णय होणार की, नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुक पार पडणार असा संभ्रम आता इच्छुक उमेदवार आणि विविध पक्षांच्या नेते मंडळींमध्ये निर्माण झालेला दिसत आहे. त्यामुळे इच्छुकांनी त्यांच्या प्रभागात सुरू केलेल्या भेटीगाठी आणि तयारी गेल्या दोन दिवसात मंदावलेली दिसत आहे. प्रभागात सुरू केलेल्या भेटीगाठी आणि तयारी मंदावली

संधी हुकलेल्यांना पुन्हा आशा
नगर पालिका प्रभाग रचना आणि आरक्षण या दोन्ही बाबी पार पडल्या आहेत. त्यात बऱ्याच इच्छुकांच्या इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने त्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. त्यामुळे त्यांना निवडणुकीत नशीब आजमविण्याची संधी मिळणार नाही. मात्र गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या या संभ्रमामुळे संधी हुकलेल्यांना पुन्हा एकदा संधी मिळेल असे वाटत असल्याने त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

विविध पक्षांचे पदाधिकारीही संभ्रमावस्थेत
राज्यात नुकत्याच झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वच पक्षांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यात जिल्ह्यातील सर्व प्रमुख पक्षांनी या निवडणुका गांभीर्याने घेतल्या असुन जिल्हा परिषद आणि नगर पालिकांसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. मात्र अशात जिल्हा परिषदेसंदर्भात आलेल्या नव्या निर्णयाने नगर पालिकेबाबद संभ्रम तयार झाला असुन पक्षाचे पदाधिकारीही त्यात अडकले आहे.

नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष
नगर पालिका निवडणुकीचे वारे आता तेजीत वाहू लागले आहेत. त्यातच आरक्षण सोडत निघुन त्याची अंतीम अधिसूचनाही काढण्यात आली आहे. मात्र यंदा नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे सर्व आठही नगर पालिकांमध्ये नगराध्यक्षपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष आहे. या सोडतीवर इच्छुकांची स्वप्ने अवलंबुन आहेत हे विशेष.

बातम्या आणखी आहेत...