आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी:भरपावसात तहसीलवर धडकला काँग्रेसचा बैलबंडी, ट्रॅक्टर मोर्चा

यवतमाळ22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हल्लाबोल करीत काँग्रेसने सोमवारी तहसील कार्यालयावर बैलबंडी, ट्रॅक्टर मोर्चा काढला. भरपावसात निघालेल्या या मोर्चात शेकडो शेतकऱ्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते.अतिवृष्टीने शेतकरी हवालदिल झाला असून पिकांचे नुकसान झाले असतानाही केंद्र शासनाने मदत दिली नाही. राज्य शासनाने तुटपुंजी मदत जाहीर केली. ती सुद्धा अद्याप पोहोचलेली नाही. घरकुलांची योजना सुरु असली तरी घरकूल योजनेतील जाचक अटीमुळे लाभार्थी वंचित राहत आहे. जीवनावश्यक वस्तूंवरील जीएसटी, पेट्रोल-डिझेल दरवाढ, गॅसच्या वाढलेल्या किमती या सोबतच बेरोजगारीवर तोडगा काढण्यात केंद्र शासन अपयशी ठरल्याचा हल्लाबोल काँग्रेसने केला आहे. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसने जिल्हाभरात मोर्चाचे आयोजन केले आहे. तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, महागाई कमी करावी, युवकांना रोजगार, पुरामुळे वाहून गेलेल्या शेतजमिनीला सरसकट मदत द्यावी, पीक विमा त्वरीत द्यावा, पुराने खचलेल्या विहिरी शासकीय निधीतून बांधून देण्यात याव्यात, आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी जि. प. चे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, बाजार समितीचे सभापती रवींद्र ढोक, रमेश भिसनकर, चंद्रशेखर चौधरी, कृष्णा पुसनाके आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महागाईने सामान्यांचे मोडले कंबरडे
दिवसेंदिवस वाढत चालल्या महागाईला केंद्र सरकार जबाबदार आहे. देशातील वाढती महागाई, बेरोजगारीच्या प्रश्नावर काँग्रेसने लढा उभारला असून, काँग्रेस सर्वसामान्य जनतेसोबत हा लढा आणखी तीव्र करणार आहे. देशात महागाई, बेरोजगारी प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे सामान्य जनता हतबल झाली आहे. केंद्र शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे दिवसेंदिवस महागाई वाढली आहे.
बाळासाहेब मांगुळकर, माजी उपाध्यक्ष जि.प. यवतमाळ.

बातम्या आणखी आहेत...