आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पालिका प्रशासनाचा पुढाकार:घरगुती विसर्जनासाठी शहरात 35 कृत्रिम टाक्यांची निर्मिती; सार्वजनिक विहिरींचीही विसर्जनासाठी केली स्वच्छता

यवतमाळ17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दोन वर्षांच्या कोरोना संसर्गाच्या कालावधीनंतर यंदा सर्वत्र निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला. त्यात घरोघरी गेल्या दहा दिवसांपासून विराजमान झालेल्या गणरायाच्या मुर्तींचे विसर्जन शुक्रवार दि. ९ सप्टेंबर रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी नगर पालिका प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या खुल्या जागांवर कृत्रिम टाक्यांची निर्मिती केली आहे.

यंदाचा गणेशोत्सव सर्वत्र धुम-धड्याकात साजरा करण्यात आला. घरोघरी गणरायाची विधिवत स्थापना करण्यात आली होती. सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांमध्ये गणेशमूर्ती विसर्जीत केल्याने पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होतात. इतकेच नव्हे तर प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती काही दिवसातच त्या स्त्रोतांच्या काठावर पडुन दिसतात. त्यामुळे गणेशमूर्तीची विटंबना होण्याचीही शक्यता असते.

या सर्व बाबी लक्षात घेता नागरिकांना गणेशमूर्ती विसर्जनासाठी त्यांच्याच परिसरात सोईचे ठिकाण उपलब्ध व्हावे आणि सार्वजनिक पाण्याच्या स्रोतांचे मुर्ती विसर्जनामुळे होणारे प्रदुषण थांबावे यासाठी नगर पालिका प्रशासनाने पुढाकार घेत शहरातील वेगवेगळ्या परिसरामध्ये तब्बल ३५ ठिकाणी घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम टाके तयार करुन दिले आहेत. त्यात बालाजी सोसायटी परिसरातील या टाक्यांमध्ये विसर्जन करण्यात येणाऱ्या गणेशमूर्तींची पालिका प्रशासनाच्या वतीने योग्य पद्धतीने व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरवासीयांनी त्यांच्या घरातील किंवा परिसरातील लहान गणेश मुर्तींचे विसर्जन पालिकेने तयार केलेल्या या कृत्रिम टाक्यांमध्येच करावे असे आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

निर्माल्यांसाठी वेगळी व्यवस्था
हार आणि इतर निर्माल्य यांचा वापर करुन खत तयार करता यावे यासाठी पालिका प्रशासनाने कृत्रीम टाक्यांच्या शेजारी निर्माल्य संकलित करण्याचीही व्यवस्था केली आहे. त्यामध्ये जमा झालेले निर्माल्य खड्ड्यांमध्ये पुरून खत निर्मीती करण्याचे नियोजन केले आहे.

सायंकाळी विद्युत व्यवस्था
गणेशमुर्तींचे विसर्जन सायंकाळी करणाऱ्यांची संख्या अधीक असते. अशा स्थितीत पालिकेने तयार केलेल्या कृत्रीम पाण्याच्या टाक्यांशेजारी आणि इतर सार्वजनिक विहिरींच्या जवळ सायंकाळी अंधारात मुर्ती विसर्जन करताना त्रास होवु नये यासाठी ही व्यवस्था करण्यात आली.

घरातच करा मातीच्या गणेशमूर्तीचे विसर्जन
मातीच्या गणेश मूर्तीचीच स्थापना करावी यासाठी दैनिक दिव्य मराठीच्या वतीने दरवर्षी व्यापक जनजागृती अभियान राबवण्यात येते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक नागरिक आपल्या घरी मातीच्या गणेशमूर्तीची स्थापना करतात. या मातीच्या गणेशमूर्तीचे घरातच विसर्जन करावे आणि मूर्तीची माती वापरुन त्यात वृक्ष लावावे असे आवाहन दैनिक दिव्य मराठीच्या वतीने करण्यात आले आहे.अशा प्रकारे विसर्जनासाठी टाके तयार करण्यात आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...