आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यक्रम:ग्राहकांची जागृती ही काळाची गरज; रासेयोच्या कार्यक्रमात ग्राहक पंचायतचे प्रा. मतीन खान यांचे प्रतिपादन

दिग्रस4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जन्मापासून मृत्यूपर्यंत माणूस ग्राहक असतो. ग्राहकांनी बाजारातून खरेदी करताना अधिक जागृत राहून खरेदी केलेल्या वस्तूचे पक्के देयक दुकानदारांकडून घ्यावे, तो त्यांचा अधिकार आहे. या जबाबदारीची जाणीव ठेऊन ग्राहकाने राष्ट्र निर्माणात योगदान द्यावे. मात्र हा ग्राहक हवा त्या प्रमाणात जागृत नसून ग्राहक जागृत होणे आज काळाची गरज असल्याचे मत, दिग्रस तालुका ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा.मतीन खान यांनी व्यक्त केले. ते राष्ट्रीय सेवा योजनेकडून आयोजित कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

दिग्रस येथील बा. बु. कला, ना. भ. वाणिज्य, बा. पा. विज्ञान महाविद्यालया कडून राष्ट्रीय सेवा योजनेच्या सात दिवसीय कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याच दरम्यान कॅम्पच्या पाचव्या दिवशी प्रा. अपर्णा पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर प्रा. मतीन खान व अॅड. के. जी. देशपांडे, ग्राहक पंचायतचे तालुका संघटक ऋषिकेश हिरास, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रा. मतीन खान यांनी हक्क संरक्षण कायदा, त्या कायद्यांचा वापर, तसेच ग्राहकांनी कशाप्रकारे फसवणुकीपासून सावध राहिले पाहिजे याबाबत सविस्तर माहिती दिली.

सोबतच ग्राहकांनी फसवणूक झाल्यास ग्राहक पंचायतीकडे तक्रार दिली पाहिजे, तक्रार दिल्यानंतरच पुन्हा ग्राहकांची फसवणूक होणार नाही याकरिता कारवाई होऊ शकते. त्यामुळे ग्राहकांनी ग्राहक पंचायतीकडे तक्रार करण्याचे सुद्धा आवाहन केले. याच कार्यक्रमात दिग्रस येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. के.जी.देशपांडे यांनी महिलांचे अधिकार, महिलांच्या सुरक्षिततेसाठी शासनाने केलेले विविध कायदे याविषयी माहिती दिली. यावेळी महिलांनी सुद्धा कायद्याने आपल्यावर झालेल्या अत्याचाराला वाचा फोडली पहिजे असे आवाहन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रा.अपर्णा पाटील यांनी महिलांच्या कायद्यांविषयी माहिती देत महिलांनी आपल्या कायद्याविषयी जागरूक राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रा.अपर्णा पाटील, प्रा.प्रिया भट, कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रवीण चांडक, प्रा. मनोज भगत, प्रा. जाधव, प्रा. जायगावकर, प्रा. गडकर यांच्यासह रासेयोचे स्वयंसेवक उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...