आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपयांची घट:कापसाच्या दरात पाचशे रुपयांची घट, तेजीकडे नजरा

यवतमाळ7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा कापसाच्या उत्पादनात घट येण्याची शक्यता असल्याने गेल्या आठवड्यात ९ हजाराच्या पार पोहचलेले कापसाचे दर पाचशे रुपयांनी घटून ८७०० वर आले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात पुन्हा एकदा चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. कापूसविक्रीचा हंगाम सुरू होताच दर नऊ हजाराच्या पार गेल्यान्याने यंदा कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज होता. मात्र आता दर कमी झाल्याने या भावात तेजी कधी येणार याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागुन आहेत.

यंदा सुरुवातीपासून कापसाचे दर चांगले आहेत. गेल्या वर्षी कापसाला चांगले दर मिळाले होते. मात्र, अखेरच्या टप्प्यात दरवाढ झाल्याने शेतकर्‍यांपेक्षा व्यापार्‍यांनाच त्याचा फायदा अधिक झाला. यंदा हंगामाच्या सुरुवातीपासून कापसाला चांगले दर मिळण्याचा अंदाज तज्ज्ञांचा होता. तो मध्यंतरी खरा होताना दिसत होता. कापूसविक्रीला सुरुवात होण्याआधीच दर नऊ हजार रुपयांच्याही पुढे गेला होता. त्यामुळे यंदा हंगामाच्या सुरूवातीपासूनच कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळणार अशी परिस्थिती दिसत होती. मात्र गेल्या आठवड्यात मिळालेल्या या दरामध्ये सुमारे ५०० रुपये इतकी घट झाली आहे. त्यामुळे मंगळवार दि. २२ नोव्हेंबर रोजी कापसाचे दर ८७०० वर आलेले दिसुन आले.

यंदा कपाशीला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. पिकांची वाढ खुंटल्याने त्याचा परिणाम उत्पादनावर होण्याची भीती आहे. शिवाय, कापूस उशिरा हातात येईल, असाही अंदाज आहे. काही भागांत बोंडअळीचा प्रादुर्भाव सुरुवातीला दिसला. त्यातून कपाशी पीक शेतकर्‍यांच्या हाती आल्यास या कापसाला चांगले दर मिळतील अशी आशा आहे. मात्र प्रत्यक्षात कापसाचे दर कमी झाल्याचे दिसत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत असल्याचे दिसत आहे.सुरुवातीपासून सुपरला नऊ हजार दोनशे रुपये दर मिळाले होते. त्यामुळे आता कापसाच्या दरात तेजी येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. गेल्यावर्षी शेवटच्या टप्प्यात कापसाला १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला होता. मात्र असे असताना अचानक कापसाचे दर ५०० रुपयांनी घसरले असल्याने नवे प्रश्न उपस्थित होत आहे.

खेडा खरेदीवर लक्ष
खेडा खरेदीत गावातीलच व्यापारी शेतकऱ्यांची लूट करीत आहेत. यामध्ये भाव कमी व शेतकर्‍यांची लूट होत असल्याचे दिसून येते. अनेकदा हे व्यापारी अडचणीच्या वेळी मदत करतात व त्याबदल्यात कापसाची खरेदी करतात. यंदा जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने खेडा खरेदीवर लक्ष केंद्रित केले आहे. अधिकार्‍यांना तसा सूचना केल्या असून, खेडा खरेदी करताना आढळल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे.

बातम्या आणखी आहेत...